पुणे

संशोधक विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा

CD

पुणे, ता. १५ : जाहिरातींवर हजारो कोटी रुपये खर्च करणारे राज्य सरकार विद्यार्थ्यांच्या योजनांकडे मात्र दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत, सोमवारी संशोधक विद्यार्थ्यांनी ‘आक्रोश मोर्चा’ काढला. गेल्या तीन वर्षांपासून बार्टी, सारथी आणि महाज्योती या संस्थांमधील संशोधक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती (फेलोशिप) वेळेवर मिळत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
संशोधक विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेतर्फे (बार्टी) ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती’, तर छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेतर्फे (सारथी) ‘छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती’ आणि महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेतर्फे (महाज्योती) ‘महात्मा जोतिबा संशोधन अधिछात्रवृत्ती’ देण्यात येते. मात्र गेल्या तीन वर्षांपासून वेळेवर शिष्यवृत्ती मिळत नसल्याने विद्यार्थ्यांनी आक्रोश मोर्चा काढला.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून सकाळी दहा वाजता या मोर्चाची सुरुवात झाली. कृषी महाविद्यालय, सीओईपी विद्यापीठामार्गे गोपाळ कृष्ण गोखले चौकापर्यंत मोर्चा काढण्यात आला. शेकडो विद्यार्थी हातात फलक घेऊन, घोषणा देत या मोर्चात सहभागी झाले होते. या मोर्चानंतर हे सर्व विद्यार्थी गोपाळ कृष्ण गोखले चौकातील कलाकार कट्टा येथे आंदोलनासाठी बसले होते. या वेळी, अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. ‘‘पोटाला चिमटा काढून संशोधन करत आहोत. सरकारने आम्हाला वाऱ्यावर सोडलं आहे,’’ असे एका संशोधक विद्यार्थ्याने सांगितले.

भर पावसातही आंदोलन सुरूच...
या आंदोलनात राज्यभरातून विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. परभणी, राहुरी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, अकोला आदी भागांतून विद्यार्थी पुण्यात दाखल झाले होते. सायंकाळी चार वाजताच्या सुमारास अचानक पावसाने जोरदार हजेरी लावली, तरीही विद्यार्थ्यांनी न डगमगता आपले आंदोलन सुरूच ठेवले. पावसाच्या सरींना न जुमानता त्यांनी आपली मागणी ठामपणे मांडली आणि संघर्षाची जिद्द कायम राखली. भरपावसातही विद्यार्थ्यांचा निर्धार डगमगला नाही.

सरकारच्या निष्क्रियतेमुळे संशोधन थांबले
या विषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता अकोला येथून आंदोलनासाठी पुण्यात आलेली समृद्धी राठोड म्हणाली, ‘‘शिष्यवृत्तीच्या प्रतीक्षेत अनेक विद्यार्थ्यांचे संशोधन कार्य थांबले आहे. त्यांना स्वतःच्या खर्चाने हे काम करावे लागत आहे. या संदर्भात गेल्या दोन वर्षांपासून सरकार आणि प्रशासनाशी पत्रव्यवहार करूनही काहीच प्रतिसाद मिळालेला नाही. सरकारने सार्वजनिक शिक्षणव्यवस्था आणि संशोधनाला संपवण्याचा डाव आखला आहे.’’

आम्ही अनेकदा उपोषणे आणि मोर्चे काढले. गेल्या २२ दिवसांपासून आम्ही सारथीच्या मुख्य इमारतीजवळ उपोषण केले, मात्र सरकार आणि प्रशासन आमच्या मुद्द्यांकडे सर्रास दुर्लक्ष करत आहे. संशोधनासाठी मोठ्या प्रमाणात पैशांची गरज असते. गरीब कुटुंबातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा खर्च परवडणारा नाही. सरकार झोपेचे सोंग घेऊन आहे. त्यांना विद्यार्थ्यांची अजिबात काळजी नाही.
- दयानंद पवार, संशोधक विद्यार्थी

सरकार आरक्षणावरून अस्मिता पेटवतं, पण आरक्षणाने तरतूद केलेला निधी विद्यार्थ्यांना संघर्ष करूनही मिळत नाही. उलट, आमचे आंदोलन कसे मोडून काढता येईल, याचाच विचार प्रशासन आणि सरकार करते. सरकार शिक्षणाचे बाजारीकरण करत आहे, ज्यामुळे शिक्षण सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे. सर्वांना मोफत आणि दर्जेदार शिक्षण देणे हे सरकारचे कर्तव्य आहे, पण सरकार हे कर्तव्य विसरले आहे.
- राहुल ससाणे, संशोधक विद्यार्थी

या आहेत प्रमुख मागण्या
- सारथी, बार्टी आणि महाज्योती या सर्व संस्थांच्या जाहिराती तत्काळ प्रसिद्ध कराव्यात
- नोंदणी दिनांकापासून सरसकट शिष्यवृत्ती जाहीर करावी
- संपूर्ण निवड प्रक्रिया एका महिन्यात पूर्ण करावी
- शिष्यवृत्ती वेळेवर देण्यात यावी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-Ukraine: भारताकडून येणाऱ्या डिझेलवर युक्रेन घालणार बंदी? रशियाच्या तेल खरेदीमुळे अनेक देशांनी केलं लक्ष्य

Pune Crime : युवकांकडून संघटित गुन्हेगारी घडवण्यात बंडू आंदेकरचा हातखंडा

Asia Cup 2025: UAE च्या विजयाने पाकिस्तानला दिलंय टेन्शन! सुपर फोरमध्ये कोण मिळवणास स्थान?

Banjara Morcha: बंजारा समाजाच्या मोर्चात धनंजय मुंडेंना विरोध; वंजारा-बंजारा एक असल्याच्या विधानाचा निषेध

Nepal Sushila Karki Government : नेपाळच्या सुशीला कार्की सरकारचा मोठा निर्णय! आंदोलनात जीव गमावलेल्या ‘Gen-Z’ ना शहीद दर्जा!

SCROLL FOR NEXT