पुणे, ता. १६ ः आयुष कोमकरचा खून करण्यासाठी वापरलेले पिस्तूल कृष्णा आंदेकरनेच दिले होते, अशी कबुली गोळीबार करणाऱ्यांनी दिली आहे. आंदेकरला ते पिस्तूल कोणी पुरविले; तसेच गुन्हा केल्यानंतर फरार असताना तो कुठे व कोणाच्या संपर्कात होता. त्याने गुन्ह्याचा पुरावा नष्ट केला आहे का?, याबाबत तपास करायचा असल्याची माहिती पुणे पोलिसांनी मंगळवारी (ता.१६) न्यायालयात दिली.
पोलिस तपासात आरोपी अमन पठाण आणि सुजल मेरगू यांनी गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल कृष्णा आंदेकरने दिल्याचे पोलिसांना सांगितले. माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष गणेश कोमकर याच्यावर गोळीबार करून खून केल्याप्रकरणी आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू ऊर्फ सूर्यकांत राणोजी आंदेकर (वय ७०, रा. नाना पेठ) याच्यासह १३ जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मकोका) कारवार्इ करण्यात आली आहे.
बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा ऊर्फ कृष्णराज सूर्यकांत आंदेकर (वय ३६, रा. नाना पेठ) स्वतःच्या भाच्याच्या खुनानंतर पसार झाला होता. गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला मंगळवारी अटक केली आहे. ‘कृष्णा आंदेकर याची माहिती दे, नाहीतर त्याला गोळ्या घालू’ अशी धमकी पोलिसांनी दिल्याचा दावा बंडू आंदेकर याने सोमवारी (ता. १५) केला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी कृष्णा आंदेकर स्वतःहून समर्थ पोलिस ठाण्यात शरण आला. पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्याला अटक करून विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयात हजर केले होते. गुन्ह्याचे तपास अधिकारी सहाय्यक आयुक्त शंकर खटके यांनी तपासाची माहिती न्यायालयास दिली.
कृष्णाने पिस्तूल कोठून आणले?
मालमत्ता व पैशांच्या वादातून हा खून झाला आहे. कृष्णा हा मारेकरी आणि कट रचणाऱ्या आरोपींमधील प्रमुख दुवा आहे. कृष्णाने पिस्तूल कोठून आणले, फरार असताना तो कोणाच्या संपर्कात होता, या कालावधीत त्याने पुरावा नष्ट केला आहे का, आदी मुद्द्यांवर तपास करायचा आहे. आरोपीच्या स्थावर व जंगम मालमत्तेची माहिती मिळवायची आहे. त्यासाठी आरोपीला पोलिस कोठडी द्यावी, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील विलास पठारे यांनी केली.
कृष्णा आंदेकरला दोन दिवसांची पोलिस कोठडी
आरोपीच्या वतीने अॅड. मनोज माने, अॅड. मिथुन चव्हाण, अॅड. प्रशांत पवार यांनी बाजू मांडली. ‘गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल आधीच जप्त करण्यात आले आहे. आरोपी स्वतःहून पोलिसांसमोर हजर झाला असून, तपास यंत्रणेला सहकार्य करत आहे. त्यामुळे त्याच्या पोलिस कोठडीची आवश्यकता नाही,’ असा युक्तिवाद अॅड. मनोज माने यांनी केला. सरकार व बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी आरोपी कृष्णा आंदेकरला १८ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
---------------
मोबाईलची लावली विल्हेवाट
पोलिस तपासादरम्यान पोलिसांनी कृष्णा आंदेकरकडे त्याचा मोबाईल मागितला असता, त्याने तो तोडून फेकून दिला असल्याचे सांगितले. मकोका कायद्यानुसार कारवाईची नोटीसही घ्यायला नकार दिल्याची कबुली त्याने न्यायालयात दिली. आरोपींनी गोळीबार करण्यासाठी वापरलेले दोन पिस्तूल पोलिसांनी जप्त केले आहेत, तसेच अमन पठाण याने गुन्ह्यात वापरलेली दुचाकीदेखील जप्त केल्याची माहिती खटके यांनी न्यायालयास दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.