महिमा ठोंबरे ः सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. १९ ः आद्य साहित्य संस्था असणाऱ्या महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांची बहुप्रतिक्षित निवडणूक अखेर लवकरच जाहीर होणार आहे. पुढील शनिवारी (ता. २७) परिषदेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत निवडणुकीचा प्रस्ताव मांडला जाणार आहे. सभेने मान्यता दिल्यावर दहा वर्षांनंतर परिषदेच्या निवडणुकांचे बिगूल वाजेल.
विशेष म्हणजे, परिषदेकडेच महामंडळ असताना आणि येत्या जानेवारी महिन्यात साहित्य संमेलन नियोजित असतानाच निवडणूक होणार आहे. ३१ मार्च २०२६ पूर्वीच नवे कार्यकारी मंडळ निवडून येणे आवश्यक असल्याने लवकरच निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होईल. परिषदेची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी (ता. २७) दुपारी तीन वाजता माधवराव पटवर्धन सभागृहात होणार असून याबाबतची सूचना परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. सभेच्या कामांमध्ये कार्यवृत्त, ताळेबंद, अर्थसंकल्प संमत करण्यासह पंचवार्षिक निवडणुकीचा प्रस्ताव सादर करण्याचा उल्लेख आहे.
परिषदेची मागील निवडणूक २०१६ मध्ये झाली होती. २०२१ मध्ये कोरोना काळात निवडणूक घेण्याची परिस्थिती नसल्यामुळे वार्षिक सर्वसाधारण सभेत मतदान घेऊन याच कार्यकारी मंडळाने कामकाज सुरू ठेवले. कार्यकारी मंडळाच्या म्हणण्यानुसार सभासदांनी मतदान करून त्यांना पुढील पाच वर्षांसाठी निवडून दिले. काही सभासदांनी मात्र ही मुदतवाढ बेकायदा असल्याचा आरोप करत न्यायालयात धाव घेतली होती. हे प्रकरण धर्मादाय आयुक्तांकडे न्यायप्रविष्ट असतानाच निवडणुका जाहीर होत आहेत.
याबाबत परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी म्हणाले, ‘‘कोरोनाच्या संकटावेळी २०२१ मध्ये प्रा. मिलिंद जोशी यांच्याऐवजी दुसरी कोणतीही व्यक्ती कार्याध्यक्षपदी असती; तरी त्यांनाही वार्षिक सर्वसाधारण सभेला सामोर जाऊन निवडणुकीचा कौल मागावा लागला असता. त्यामुळे आम्ही वार्षिक सभेला सामोरे जाऊन सभासदांना निवडणुकीचा निर्णय मागितला, हात उंचावून मतदान झाले आणि मतदानातून आम्ही पाच वर्षांच्या कार्यकालासाठी निवडून आलो. ही मुदत ३१ मार्च २०२६ ला संपत असल्याने वार्षिक सर्वसाधारण सभेत आम्ही निवडणुकीचा प्रस्ताव मांडणार आहोत.’’
सध्या महामंडळ ‘मसाप’कडे असल्याने त्याआडून आम्हाला सहजपणे मुदतवाढ घेणे शक्य होते. त्यात १००व्या साहित्य संमेलनाचे कारणही प्रबळ होते. पण लोकशाही मार्गाने निवडून येऊनच १००वे साहित्य संमेलन करावे, अशी आमची भूमिका आहे. २०१६ च्या निवडणुकीवेळी जाहीरनाम्यात दिलेली सर्व आश्वासने आम्ही या दहा वर्षांत पूर्ण केली आहेत. त्यामुळे या निवडणुकीतही सभासद आम्हालाच निवडून देतील, याची खात्री आहे.
- विनोद कुलकर्णी, कोषाध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद