पुणे, ता. २७ ः ‘‘विदर्भ-मराठवाड्याला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. पुरामध्ये दीडशे जणांचा मृत्यू झाला आहे. आम्ही मदतीसाठी पोहोचलो आहोत. मात्र अजूनही राज्य सरकारने शेतकऱ्यांना पुरेशी मदत जाहीर केलेली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्या भेटीत पूरग्रस्तांना मदत करण्यापेक्षा गडचिरोलीतील खनिकर्म माफियावरच चर्चा झाली,’’ अशा शब्दांत कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी राज्य व केंद्र सरकारवर टीका केली.
कॉंग्रेस पक्षातर्फे पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांसमवेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत शनिवारी कॉंग्रेस भवन येथे जिल्हानिहाय आढावा बैठक घेण्यात आली होती. त्यानंतर रमेश चेन्नीथला व कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पक्षाचे सहप्रभारी बी. के. संदीप, माजी गृहराज्यमंत्री व पक्षाचे पुणे शहर प्रभारी सतेज पाटील, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, पक्षाचे उपाध्यक्ष मोहन जोशी, राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी आदी उपस्थित होते.
बैठकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत चर्चा झाल्याचे चेन्नीथला यांनी सांगितले. राज्यातील पूरस्थितीबाबत चेन्नीथला म्हणाले, ‘‘विदर्भ, मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे, त्याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. दीडशे जणांचा मृत्यू झाला आहे, त्याचबरोबर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कॉंग्रेसतर्फे पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी व मदतीसाठी आम्हीही पथक पाठविलेले आहे. सरकारची मदत अजूनही मिळालेली नाही. भाजप सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी करू, असे आश्वासन दिले होते, आता तरी भाजप आश्वासन पाळणार का? आपत्ती व्यवस्थापनअंतर्गत शेतकऱ्यांना मदत केव्हा मिळणार आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर येतील, तेव्हा पूरस्थितीची पाहणी करतील का?’’
-------
निवडणूक आयोग भाजपचे काम करतो
राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील मतचोरी प्रकरण उघड केले. त्याबाबत निवडणूक आयोगाने एकदाही उत्तर दिलेले नाही. निवडणूक आयोगाने निःपक्षपातीपणे काम करणे आवश्यक आहे. मात्र, निवडणूक आयोग पूर्णपणे भाजपचे काम करत आहे, असा आरोपही चेन्नीथला यांनी केला.
------------
‘‘निवडणुकीमध्ये आघाडी किंवा वेगवेगळे लढायचे याबाबत चर्चा सुरू आहे. पण पक्ष वाढला पाहिजे. युती-आघाडीमध्ये पक्षाला फटका बसतो. शेवटी संघटना महत्त्वाची आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमधील आघाडीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवरच सोपविला जाईल, त्याबाबत मित्र पक्षाला आम्ही सांगितले आहे.
- हर्षवर्धन सपकाळ, प्रदेशाध्यक्ष, कॉंग्रेस
---------------------