पुणे, ता. २७ : सहकार क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल पुण्याच्या पहिल्या महिला माजी महापौर आणि राजर्षी शाहू बॅंकेच्या उपाध्यक्ष कमल व्यवहारे यांना पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनचा कै. मीराताई देशपांडे पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.
अमनोरा फाउंडेशनतर्फे भगिनी निवेदिता बँकेच्या माजी संचालिका कै. मीराताई देशपांडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी नागरी सहकारी बँकांमधील महिला संचालकांना हा पुरस्कार प्रदान केला जातो. व्यवहारे यांचे शैक्षणिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रांमध्ये भरीव योगदान आहे. अनेक सामाजिक संस्थांवर त्या पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. पुरस्कार प्रदान कार्यक्रमास पुणे बँक असोसिएशनचे अध्यक्ष नीलेश ढमढेरे, उपाध्यक्ष रमेश वाणी, मानद सचिव अॅड. सुभाष मोहिते, मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत शेळके, संचालक मंडळ, राजर्षी शाहू बँकेचे अध्यक्ष शांताराम धनकवडे तसेच देशपांडे कुटुंबीयांच्यावतीने अनिरुद्ध देशपांडे यांचे सहकारी विवेक कुलकर्णी उपस्थित होते.