प्रवाशांचा ''थांबा'' उन्हातच
दीड वर्षात केवळ १०० थांबे बांधले, प्रवाशांचे हाल
प्रसाद कानडे: सकाळ वृत्तसेवा
पुणे,ता.२८ रोज सुमारे १३ लाख प्रवाशांना आपल्या गंतव्य स्थानी पोचविणाऱ्या पीएमपीचे बस थांब्या विषयी असलेल्या अनास्थेमुळे यंदाच्या वर्षीही प्रवाशांना उन्हातच ''थांबण्याची'' शिक्षा मिळाली आहे. जाहिरातदाराने वर्षात ३०० बस थांबे बांधून देण्याची हमी दिली, मात्र गेल्या पावणे दोन वर्षात केवळ १०० थांबे बांधून दिले. त्याला नोटीस देण्यापलीकडे पीएमपी प्रशासनाने काही केले नाही.पीएमपी प्रशासनाने जाहिरातदारावर कारवाई न करता त्याला वाऱ्यावर सोडले अन प्रवाशांना उघड्यावर. परिणामी प्रवाशांना तळपत्या उन्हात, घामाघूम होऊनच प्रवास करावा लागत आहे.
पीएमपी प्रशासनाकडे बसथांबा बांधण्यासाठी आवश्यक तो निधी नाही. त्यामुळे बीओटी तत्त्वावर ''सिद्धी'' एडीव्हीटी ही कंपनी ''स्टेनलेस स्टीलचे''थांबे बांधून देण्याचे ठरले. जुलै २३ मध्ये पीएमपी व या सिद्धी यांच्यात करार झाला. ३०० दिवसांत ३०० थांबा बांधून देण्याचे ठरले. मात्र आज तागायत केवळ १०० थांबे बांधून झाले असल्याचे पीएमपी प्रशासनाने सांगितले.परिणामी २०० थांब्यावरच्या प्रवाशांना उन्हात थांबण्याची शिक्षा पीएमपी प्रशासन देत आहे.
----------------
गरज ९००० बसथांब्याची, प्रत्यक्षात मात्र ११८५ :
पुणे,पिंपरी चिंचवड व पीएमआरडीए असे तिन्ही क्षेत्र मिळून तसेच येणारे व जाणाऱ्या असे दोन्ही मार्गाचा विचार करून पीएमपी कडे सुमारे ९ हजार बसथांब्याची नोंद आहे. पैकी केवळ ११८५ थांब्यावरच छत आहेत. त्यातच बीआरटीच्या १२० थांब्यांचा समावेश आहे. थांब्यासारखी प्राथमिक सुविधा देण्यातच पीएमपीला अपयश येत आहे. निधीची कमतरता सांगत जाहिरातदाराकडे बोट दाखविले जाते.
------------
थांब्याला शेड नसल्याने :
१.प्रवाशांची प्रचंड गैरसोय होते. प्रवाशांना तळपत्या उन्हातच उभे राहावे लागते.
२.पावसाळ्यात देखील प्रचंड गैरसोय होते.
३. ज्येष्ठ, महिला,लहान मुलांना बसायला जागाच नाही.
४. महिलांना लहान मुलांना कडेवर घेऊनच तासनतास बसची वाट पाहावी लागते.
-------------
पीएमपी दृष्टीक्षेपात :
एकूण बस संख्या : १६५०
प्रवासी संख्या : सुमारे १३लाख
एकूण बस थांबे : ९०००
शेड असलेले थांबे : ११८५
बीआरटी मार्गावर थांबे : १२०
एक कव्हर्ड थांब्याचा खर्च : सुमारे ४ लाख
------------
कोट : बस थांब्यावर छताची सोय असणे आवश्यक आहे. छत असलेल्या थांब्याची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. जाहिरातदाराने काम अपूर्ण केल्याने त्याला नोटीस देण्यात आली आहे.
दीपा मुधोळ -मुंडे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक,पीएमपीएमएल, पुणे.
---
कोट : मी पीएमपीची नियमित प्रवासी आहे. कामाच्या निम्मिताने मला हडपसर ते कात्रज तसेच अन्य मार्गावर प्रवास करावे लागते. काही मोजके थांबे सोडले तर थांब्यावर छतच नाही. आडोसा घेऊन कुठे थांबले तर बस त्या ठिकाणी थांबत नाही. त्यामुळे उन्हात थांबूनच बसचा प्रवास करावा लागत आहे.
गौरी देशमुख, प्रवासी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.