स्वागत दिवाळी अंकाचे.....
१) सत्याग्रही विचारधारा
भारताचे परराष्ट्र धोरण, स्त्रीमुक्ती चळवळीची ५० वर्षे, रा.स्व.संघाची शताब्दी, आर्टिफिशियल इंटेलिजन्सची जादू आणि कम्युनिस्ट चळवळीची शंभरी अशा परिसंवादांच्या माध्यमातून वैचारिक मंथन या अंकातून घडवले आहे. परिसंवादांमध्ये डॉ. कुमार सप्तर्षी, जयदेव डोळे, जतिन देसाई, परिमल माया सुधाकर, लक्ष्मी यादव, आनंदसागर शिराळकर, पंकज फणसे आदींचा समावेश आहे. याशिवाय विशेष लेखांमध्ये सनातनवली हा श्याम पाखरे यांचा लेख, धर्मांचा साम्राज्यवाद हा सुरेश द्वादशीवार यांचा आणि न्याय-द्वेषाची मेंदूनीती हा श्रुती पानसे यांचा लेख वाचनीय आहे. व्यक्तिचित्रांमध्ये निखिल गजेंद्रगडकर यांचा चित्रपट जेव्हा शस्त्र बनतो हा लेख त्याचप्रमाणे मिलिंद जोशी यांचा दळवींच्या नाटकातील पुरुष, सुर्वे मास्तरांचे विद्यापीठ हा अंजली कुलकर्णी यांचा, ऋत्विक घटक यांच्यावरील सतीश जकातदार यांचा आणि रा. रं. बोराडे यांच्यावरील इंद्रजित भालेराव यांचा लेख उल्लेखनीय आहेत. आश्लेषा महाजन, मधुवंती सप्रे, प्रमोद कोपर्डे आदींच्या कवितांनी हा अंक सजला आहे.
संपादक ः डॉ. कुमार सप्तर्षी, पाने ः २२०, किंमत- २५० रुपये.
---------------------------------------------------------------
२) ग्राहकहित
ग्राहक चळवळीचे मुखपत्र म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या ‘ग्राहकहित’ने यंदा वाचनसंस्कृती ही संकल्पना ठेवून विविध क्षेत्रातील दिग्गजांच्या वाचनवेडाचे स्वानुभव मांडले आहेत. अविनाश धर्माधिकारी, दिलीप प्रभावळकर, उत्तम कांबळे, मृणाल कुलकर्णी, शि. द. फडणीस, सोनाली कुलकर्णी, मुरलीधर मोहोळ अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींनी वाचनाचे त्यांच्या आयुष्यातील महत्त्व कथन केले आहे. याशिवाय धर्माधिष्ठित राजकारण या विषयावरील परिसंवादात मानवी समाजाची सनातन गरज, धर्माधिष्ठित राजकारण योग्य आहे का आदी विषयांवर अजित अभ्यंकर, राहुल गोखले, सुनील माळी आदींचे लेख वाचनीय आहेत. संघ शताब्दीनिमित्त सुधीर जोगळेकर यांचा शताब्दीतही संघाची नवलाई आणि सुहासराव हिरेमठ यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघः आक्षेप व वास्तव हे लेख अभ्यासपूर्ण आहेत. जागतिक महिला दिनाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त आशा बगे, डॉ. अरुणा ढेरे, मोनिका गजेंद्रगडकर, गौरी देशपांडे आणि प्रिया तेंडुलकर यांच्या आशयगर्भ कथांनी अंकाची उंची वाढवली आहे.
संपादक ः सूर्यकांत पाठक, पाने - ३४१, किंमत- ३५० रुपये.
-----------------------------------------------------------
३) वाणिज्य विश्व
दि पूना मर्चंट्स चेंबरचे मुखपत्र असलेले व्यापारी विषयाचे अंतरंग खुले करणारा वाणिज्य विश्वचा दिवाळी अंक यंदाही अर्थव्यवस्था, उद्योग, आरोग्य, शिक्षण, कायदे, साहित्य आणि समाजजीवन अशा विविध क्षेत्रांतील लेखांनी वाचकांना समृद्ध करत आहे. अर्थव्यवस्थेवर ज्येष्ठ सल्लागार अॅड. गोविंद पटवर्धन यांनी जीएसटी सुधारणांचे सखोल विवेचन केले आहे. ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. शांतिलाल भंडारी, चकोर गांधी, सुकृत देव, विनायक कुलकर्णी, देविदास देशपांडे, अॅड. एस. के. जैन, नंदिनी शहासने, ललित गांधी यांनी आर्थिक आणि कायदे क्षेत्रातील अनेक महत्त्वाच्या पैलूंवर प्रकाशझोत टाकला आहे. महानगरातील समस्यांवर ज्येष्ठ पत्रकार राजीव साबडे यांनी तर, खासगी विमानसेवा क्षेत्रावर अनिल टाकळकर यांनी लेख लिहिले आहेत. आयुर्विम्याचे महत्त्व सांगणारा सुनील टाकळकर यांचा लेख उपयुक्त आहे. ललित विभागात डॉ. आप्पासाहेब पाटील आणि शिरीष शिंदे यांचे लेख उल्लेखनीय आहेत.
संपादक ः प्रकाश नहार, पाने -३४४, किंमत -१०० रुपये
-------------------------
४) धमाल धमाका ः
संपूर्णपणे विनोदाला वाहिलेला हा दिवाळी अंक आहे. विनोदी कथा, व्यंगचित्रे, वात्रटिका, खिडकी चित्रे आदींनी अंक सजला आहे. विजय कापडी, सु. ल. खुटवड, अनिल अभ्यंकर, बबन मोरे, अजित काटकर, सुरेशचंद्र वाघ, अपर्णा देशपांडे, सुनील पांडे, भारती सावंत, राम लोखंडे, सचिन बेंडभर आदींच्या विनोदी कथा आहेत. ज्ञानेश बेलेकर, प्रभाकर झळके, संजय मिस्री, विवेक मेहत्रे, एस. ए. मुलाणी, प्रभाकर दिघेवार, महादेव साने, अरविंद गाडेकर आदींची
व्यंगचित्रे आहेत. प्रा. सय्यद अल्लाउद्दीन यांच्या वात्रटिका आहेत.
संपादक ःनसीर शेख, पाने ः २००, किंमत ः २५० रुपये
५) झुंज
ग्रामीण कथा, लेख, स्तंभ लेख आणि कविता अंकात आहेत. शंभर वर्षापूर्वी शिक्षणातील महत्त्वाच्या नोंदीबद्दलचा श्रीकांत चौगुले यांनी लिहिलेला लेख माहितीपूर्ण आहे. मुलांसाठी गोष्टी-वाचन- खेळ यावर सखोल माहिती डॉ. दिलीप गरुड यांनी त्यांच्या लेखात दिली आहे. डॉ. यशवंत पाटील यांची ‘लग्नगाठ’ ही कथा वाचनीय असून, गावाकडे राहणाऱ्या एका तरुणाने स्वतःच्या आवडीला प्राधान्य देऊन स्वतःला कसे घडवले, याबद्दलची प्रेरणादायी गोष्ट आहे. भूषण तांबे, संजय सोनवणी, शरद अत्रे, चिंतामणी देशपांडे यांचे वाचनीय लेख आहेत.
पाऊस, समाज, मानवी भाव-भावना, प्रेम इत्यादी विषयांवर असलेला ‘काव्यलहरी’ हा कवितांचा विभाग वैविध्यपूर्ण आहे.
संपादक : अनिल किसनराव वडघुले, पाने : २६४, किंमत : २०० रुपये
---------------------------------------
६) नीहार
सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केलेल्या या अंकामध्ये कथा, लेख, कादंबरी असे विभाग आहेत. श्वेता कुलकर्णी, किरण आचार्य, राजश्री सोले, डॉ. अविनाश भोंडवे, कविता मेहेंदळे, अक्षता देशपांडे, रतनलाल सोनग्रा यांचे लिखाण कथा विभागात आहे. श्याम भुर्के, सूर्यकांत कामून, राधिका भांडारकर, ज्योत्स्ना चांदगुडे, प्रा. केशव आचार्य, प्रा. डॉ. रामदास चवरे आदींचे लेख आहेत. पुष्पा कुलकर्णी, श्रीपाद टेंबे, संजय घाटे यांच्या चारोळ्या आहेत. भारती कोडितकर यांची ‘याला जीवन ऐसे नाव’ ही कादंबरी अंकात आहे. व्यंग्यचित्रांमधून विशाल सुरावकर, नितीन बंगाळे, प्रकाश वर्मा, गौतम दिवार यांनी विविध विषय हाताळले आहेत. स्वाती सामक, प्रा. रतनलाल सोनग्रा, मंदा आचार्य, मनीषा आवेकर आदींच्या कवितांनी अंक सजला आहे.
संपादक : डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी, पाने : २०८, किंमत : ३०० रुपये
-----------------------
७) लोभस
कथा, कविता, विविध विषयावरील लेख, आरोग्य, राशिभविष्य आदी मजकुरांनी अंक भरगच्च झाला आहे. श्रीकृष्ण पानसे, प्रसाद पानसे, केशव पूर्णपात्रे, मनोहर सप्रे, शशिकांत भंडारे, डॉ. सुधीर राशिंगकर, सुरेश वांदिले, डॉ. विनया केसकर, भारती सावंत आदींचे लेख व कथा आहेत.
योगंदरा बढे, मीनल रणदिवे आदींनी खाद्यजत्रेवर लिहिले आहे. विजयकुमार स्वामी यांनी राशिभविष्य लिहिले आहे. प्रशांत आष्टीकर यांची व्यंगचित्रे आहेत. प्राची देशपांडे, माणिकताई कोरडे, मेघा खळदे, मेधा सिधये यांच्या कविता आहेत.
संपादक ः प्रसाद पानसे, पाने ः ६६, किंमत ः १५० रुपये
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.