स्वागत दिवाळी अंकाचे
--------------------------
१) शब्द शिवार
वैचारिक, ललित, ललितेतर यांसारख्या विविध प्रकारांत अनेक मान्यवरांचे लेख असणारा ‘शब्द शिवार’ चा अंक आहे. ‘इतिहासच राष्ट्राचा खरा गुरू या मुलाखतीत इंद्रजित घुले यांनी इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व उलगडले आहे. भाषा आणि संस्कृती या विभागात उत्तम कांबळे, रामदास फुटाणे, सरफराज अहमद यांसारख्या लेखकांनी भाष्य केले आहे. प्रा. वैजनाथ महाजन यांचा ‘साहित्याने समाजाचे संवर्धन’ हा पुस्तक आणि मस्तक या विभागातील लेख विशेष वाचनीय आहे. डॉ. शैलजा पाटील, सायली परांजपे, सुनील साळुंखे, अंजली धमाळ, प्रमोद कोपर्डे, प्रताप गंगावणे आदी लेखकांच्या वाचनीय कथा आहेत. ‘दोन लेकरांची आई पोलिस झाली’ हा पूजा खपाले यांनी लिहिलेला अनुभव हा प्रेरणादायी आहे. राकेश साळुंखे यांचा ‘पश्चिम किनारपट्टीवरील असुर’ हा लेख माहिती आणि संदर्भपूर्ण आहे. कन्नड लेखक डॉ. एम. एम. कलबुर्गी यांचा ‘शरणांनी संकल्पिलेला स्त्री समाज’ हा अनुवादित लेखही विचार करायला लावणारा आहे. नितीन खिलारे यांनी केलेले मुखपृष्ठ बोलके आहे.
संपादक : इंद्रजित घुले
पाने : २२०, किंमत : ३०० रुपये
----------------
२) चौफेर समाचार
रौप्य महोत्सवी असलेला ‘चौफेर समाचार’ हा विज्ञान, राजकारण, तंत्रज्ञान, ललित, रिपोर्ताज, कथा, कविता अशा विविध विषयांवर आधारलेला
आहे. विविध आशय-विषयांची गुंफण असलेल्या या अंकात ‘झेप परदेशी, मन मराठी’ या विशेष लेखमालेत संगीता देशपांडे, जाई गुलमोहर, तन्वी बोरकर आदी परदेशात राहणाऱ्या मराठी माणसांचे मनोगत आहे. ‘बाप’ माणूस हा विभाग विशेष असून, बाप आणि मुलाच्या नात्याचा गोफ उलगडवणारे काही लेख आहेत. उत्पल पर्रीकर यांचा ‘बाबा, मित्र होतात तेव्हा!’ हा लेख विशेष वाचनीय आहे. आशुतोष शेवाळकर, मल्लिका अमर शेख, विलास गिते, अनिल साबळे, पूजा सामंत, सुकल्प कारंजेकर, योजना यादव, मनस्विनी प्रभुणे-नायक, किरण येले, प्रणव सखदेव, अक्षय शिंपी, अनंत खासबारदार यांसारख्या अनेक मान्यवर लेखकांच्या लेखनामुळे हा अंक वाचनीय झाला आहे. अंकातील चित्रे अन्वर हुसेन यांनी काढलेली असून, सुभाष अवचट यांचे आकर्षक मुखपृष्ठ आहे.
संपादक ः अमोल मद्वाण्णा, पाने : २८०, किंमत : ४०० रुपये
---------------------------------------
३) प्रपंच
‘प्रवासानुभव’ आणि ‘अनुभव मुलाखत घेण्याचे’ हे दोन विभाग यंदाच्या अंकाचे वैशिष्ट्य आहे. राजेंद्र बनहट्टी आणि यशोदा वाकणकर यांनी प्रवासाचे अनुभव शब्दबद्ध केले आहे. मंगला खाडिलकर, डॉ. वंदना बोकील कुलकर्णी आणि शार्दूल कदम यांनी मुलाखत घेण्याचे अनुभव मांडले आहेत. बाबू मोशाय, दिलीप कुकडे, सुहास किर्लोस्कर यांनी चित्रपट व संगीतविषयक लेखन केले आहे. प्रवीण दवणे, हेमंत देसाई, डॉ. सुहास जोशी यांचे लेख अंकात आहेत. पंजक कुरुलकर, वृंदा दिवाण, अलका मोकाशी आणि वसंत मिरासदार यांच्या दीर्घ कथांचा अंकात समावेश आहे. याशिवाय निरंजन घाटे, राजीव तांबे, प्रणव सखदेव, डॉ. अविनाश भोंडवे यांच्यासह अन्य काही लेखकांच्या कथा वाचण्याची पर्वणी वाचकांना मिळणार आहे.
संपादक : महेंद्र कानिटकर, पाने : २७२, किंमत : ३५० रुपये
--
४) विमर्श
‘संघ शताब्दी वर्ष’ विभाग हे यंदाच्या अंकाचे वैशिष्ट्य आहे. या विभागात अनेक मान्यवर लेखकांनी लेखन केले आहे. डॉ. हेडगेवार यांच्यावर रवींद्र मुळे यांनी लेख लिहिला आहे. संघ स्थापनेची पार्श्वभूमी डॉ. चंद्रकांत पाटील यांनी उलगडून सांगितली आहे. अंजली तागडे यांनी ‘संघ आणि मातृशक्ती’ यावर लेख लिहिला आहे. प्रवरा केतकर यांनी आणीबाणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. मनोहर कुलकर्णी यांनी प्रकाशने आणि प्रसार माध्यमांचे महत्त्व अधोरेखित केले आहे. अमृता खाकुर्डीकर, कविता दातार, आश्लेषा महाजन, विशाखा कुलकर्णी यांच्या ललित लेखांचा अंकात समावेश आहे. अर्चना देव, अनिल अभ्यंकर, जयंत मराठे, शोभा खानवलकर यांच्या कथांनी कथा विभाग सजला आहे. कविता विभागात ज्योती आफळे, मिलिंद दाते, नितीन आपटे, यामिनी रानडे, आरती देवगावकर यांच्या रचना आहेत.
संपादक : डॉ. नयना कासखेडीकर, पाने : १३२, किंमत : २०० रुपये
५) कोहिनूर
वाचकांसाठी विविधांगी साहित्यिक मेजवानी घेऊन ‘कोहिनूर’चा अंक आला आहे. लेखिका माधुरी संजीव कामत यांच्या ‘गिरनार परिक्रमा-एक अनुभूती’ या लेखामध्ये गिरनार पर्वताची परिक्रमा करताना आलेला आध्यात्मिक आणि आत्मिक अनुभव मांडला आहे. प्रवासवर्णनासोबत श्रद्धा, निसर्ग आणि अंतर्मनाचा संगम यात अनुभवायला मिळतो. त्याचबरोबर विद्या भोईरकर, रजनी दासरे, योगिनी पाळंदे, शुभांगी भालेराव, श्रीकांत जोशी, सलिल सावरकर, राधिका खांडेकर, सुधाकर घोडेकर आदींचे लेख आहेत. शरद अत्रे, शुभदा व्यास, वैशाली लिमये आदींच्या कविता आहेत.
संपादक ः स्नेहल बर्वे, पाने ः ८८, किंमत ः १५० रुपये
६) स्वानंद
सामाजिक, सांस्कृतिक, वैचारिक आणि सर्जनशील अशा सर्व पातळ्यांवरील लेखन या अंकात आढळते. विचारांना चालना देणारे लेख, मनाला भिडणाऱ्या कविता, जीवनानुभव सांगणाऱ्या कथा आणि अनुभवदर्शक प्रवासवर्णने यांचा अंकात समावेश आहे. डॉ. न. म. जोशी यांनी थोरांचा सहवास मांडला आहे. श्रीपाल सबनीस यांचा ‘आत्ताच्या पिढीतील ज्येष्ठांचे स्थान’ हा वैचारिक लेखही वाचनीय आहे. प्रा. प्रवीण दवणे, डॉ. अश्विनी धोंगडे, डॉ. केशव देशमुख, प्रा. सुनीता धर्मराव, श्रीराम पचिंद्रे, प्रदीप गांधीलीकर आदींचे लेख आहेत. तसेच, सदानंद भणगे, प्रा. देवबा पाटील, अशोक अर्धापूरकर, विधिज्ञ सुनील वेदपाठक, नागेश शेवाळकर, राजेंद्र भोसले, संध्या सूर्यकांत धर्माधिकारी आदींच्या कथांचा समावेश आहे. रमण रणदिवे, सुनीता टिल्लू, प्रा. अशोक बागवे, ज्योत्स्ना चांदगुडे आदींच्या कविता आहेत.
---------------------------
संपादक ः महादेव कोरे, पाने ः १८८, किंमत ः २०० रुपये
७) योगसिद्धी
हा दिवाळी अंक केवळ योगाभ्यासावर आधारित नाही, तर मानवी शरीर, मन आणि आत्म्याच्या समन्वयाचा शोध घेणारा एक सखोल साहित्यसंग्रह आहे. या अंकातून योगशास्त्र, आयुर्वेद, मनोविज्ञान आणि अध्यात्म यांच्या संगमातून एक सर्वांगीण विचारमंच उभा केला आहे. या अंकात प्रतिष्ठित योगाचार्य, वैद्य, मानसोपचारतज्ज्ञ आणि साहित्यिक यांचे लेख सामावलेले आहेत. काही लेख अनुभवकथनाच्या रूपात असून, लेखकांच्या दीर्घ साधनेचा प्रत्यय त्यातून येतो. या अंकात प्रा. मधुकर दिघे, वि. के. फडके, उल्हास मुरुडकर, ओंकार तपस्वी, स्वामी योगानंद भारती, डॉ. श्री. वि. करंदीकर, प्रभाकर शास्त्री करंबळेकर, ग. रा. टिकेकर, पं. जगदीश शर्मा, प्रभाकर कुलकर्णी आदींचे लेख आहेत.
-----------------------
संपादक ः आनंद साने, पाने ः २१२, किंमत ः ३०० रुपये
८) ग्रहबोली
------------
कल्पनाशक्ती आणि सामाजिक-वैचारिक चिंतन यांचा संगम म्हणून ‘ग्रहबोली’च्या दिवाळी अंकाकडे पहावे लागेल. या अंकात ज्योतिष, गूढविद्या, अध्यात्म, आरोग्य, अर्थ आणि पर्यटन आदी क्षेत्रांतील लेखांचा समावेश आहे. या अंकासाठी डॉ. वा. ल. मंजुळ, मीना महागावकर, न. म. जोशी, श्याम भुर्के, अमरेंद्र धनेश्वर, रमणलाल शहा, सुमती सामंत, नाडीतज्ज्ञ ईश्वरन, शैला दातार, दिलीप ठाकूर, वैद्य मोहन तांबे, पद्माकर पाठकजी, चंद्रकला जोशी, समीर लेले, प्रदीप पंडित, अरविंद चांदेकर, सेनगुप्ता सुत्रावे, जयश्री देशपांडे, अग्निहोत्री, विश्वास वसेकर, व्यंगचित्रकार विवेक म्हेत्रे आदींचे योगदान आहे.
संपादक ः सुहास डोंगरे, पाने ः १६०, किमत ः ३०० रुपये
--------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.