पुणे, ता. ४ : खडकवासला- स्वारगेट- हडपसर- खराडी मेट्रोमार्गांतर्गत हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड रोड या दोन विस्तारित मेट्रो प्रकल्पांच्या अंमलबजावणीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मंगळवारी मंजुरी देण्यात आली, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड रोड हे दोन मार्ग १६ किलोमीटर लांबीचे असून त्यामध्ये १४ उन्नत (एलिव्हेटेड) स्थानकांचा समावेश असेल. या दोन्ही विस्तारित मार्गांसाठी ५ हजार ७०४ कोटी रुपये खर्च येणार असून या पूर्णतः उन्नत मेट्रो प्रकल्पांची महामेट्रोमार्फत अंमलबजावणी करण्यास आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या दोन्ही प्रकल्पांमुळे पुणे शहरातील वाहतूक कोंडीपासून नागरिकांना दिलासा मिळेल. तसेच पुणे मेट्रोचे जाळे पूर्वेकडे विस्तारित होणार असून पूर्व पुणे आणि परिसरातील ग्रामीण भागालाही मेट्रो सेवेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे लाखो प्रवाशांना जलद आणि सुरक्षित वाहतुकीची सुविधा उपलब्ध होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री पवार यांनी व्यक्त केला.
पुणे मेट्रो टप्पा-२ अंतर्गत होणाऱ्या या दोन विस्तारित मार्गांमुळे हडपसर, फुरसुंगी, लोणी काळभोर आणि सासवडसारख्या वाढत्या उपनगरांना मेट्रो जोडली जाणार आहे. या मेट्रोमुळे प्रवासाचा वेळ वाचेल आणि प्रदूषण कमी होण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.
पुणे मेट्रो प्रकल्पांना ‘डेडलाईन’
लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर असलेल्या पुणे येथील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी मेट्रो प्रकल्पांवर लक्ष केंद्रित केले आहे. पुण्यातील मेट्रो सहा कोचच्या करून हे सर्व प्रकल्प पुढील तीन वर्षांत पूर्ण होतील, असे नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. पुणे-चिंचवड महापालिका ते निगडी या ४.४ किलोमीटर लांबीच्या इलिव्हेटेड मेट्रोचे काम जानेवारी २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. यासोबतच पुणे मेट्रो लाईन तीनचे काम लवकर पूर्ण करून खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासला या प्रकल्पासाठी भूसंपादनाची कार्यवाही तत्काळ सुरू करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
पुण्यातील मेट्रो विस्ताराची उद्दिष्टे
मेट्रो मार्ग/प्रकल्प नियोजित पूर्णता
स्वारगेट ते कात्रज (भूमिगत) मार्च २०२९
वनाज ते चांदणी चौक (विस्तार) जुलै २०२९
रामवाडी ते वाघोली/विठ्ठलवाडी (विस्तार) जुलै २०२९
पुरंदर विमानतळाला थेट जोडणी
हडपसर-लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो-सासवड कॉरिडॉर तयार करताना हा मार्ग बोगद्याद्वारे थेट पुरंदर विमानतळापर्यंत नेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच, पुरंदर विमानतळावर जाण्यासाठी रस्ते आणि मेट्रोचे नियोजन करण्यासह ‘मल्टिलेव्हल इंटिग्रेशन’द्वारे मोठ्या प्रमाणात पार्किंग सुविधा निर्माण करण्याचे निर्देशही फडणवीस यांनी बैठकीत दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.