पुणे, ता. ७ : पुणे शहरात आता ४२ मजल्यापर्यंत इमारती उभ्या राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यापूर्वी ७० मीटर म्हणजे २४ मजले अथवा त्यापेक्षा अधिक उंच इमारती बांधण्यास परवानगी हवी असेल तर त्यासाठी पुणे महापालिकेच्या ‘हाय राइज’ समितीकडे सादरीकरण करावे लागत होते. आता मुंबई, ठाणे शहराप्रमाणेच पुण्यातही १२० मीटर उंचीपर्यंत म्हणजे ४२ मजले उंच इमारती बांधकाम परवानगीसाठी या समितीकडे जाण्याची गरज राहिली नाही.
राज्य सरकारच्या नगर रचना विभागाचे अवर सचिव प्रवीण कर्पे यांनी याबाबतचा आदेश दिला आहे. पुणे शहरात सत्तर मीटरपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींना परवानगी देण्यासाठी यापूर्वी राज्य सरकारकडून विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. परंतु डिसेंबर २०२० मध्ये राज्य सरकारकडून राज्यभरात लागू करण्यात आलेल्या ‘यूडीसीपीआर’ या नियमावलीत ही समितीची परवानगीची अट रद्द करण्यात आली. परंतु पुणे महापालिकेने अशा इमारतींना परवानगी देण्यासाठी स्वतःच्या पातळीवर एक समिती स्थापन केली आहे. त्यामुळे अशा बांधकामांना परवानगी घेताना विलंब लागतो. या पार्श्वभूमीवर अशा बांधकामांना परवानगी घेण्यासाठी समितीची अट रद्द करावी, यासह विविध मागण्या क्रेडाई पुणे मेट्रोसह बांधकाम क्षेत्रातून होत होत्या. त्यानुसार पुणे शहरात १२० मीटर उंचीपर्यंत इमारती उभारण्यास समितीची परवानगी घेण्याची गरज नाही. तशी तरतूद मंजूर एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीमध्येदेखील (यूडीसीपीआर) नाही. त्यामुळे असे प्रस्ताव सादर झाल्यास ते मान्यतेसाठी समितीपुढे पाठविण्याची गरज नाही, असे कर्पे यांनी आदेशात म्हटले आहे.
महत्त्वाचे
१) बारा मीटरपेक्षा अधिक रुंदीच्या रस्त्यांवर पुणे शहरात अशा इमारती उभारण्याचा मार्ग मोकळा
२) मात्र, त्याला प्लॉट क्षेत्रफळाचे बंधन असणार आहे
३) सर्वसाधारणपणे बांधकामामध्ये एक मजला २.८५ मीटर उंचीचा असतो
४) १२० मीटर उंचीपर्यंत परवानगी मिळाल्यास ४२ मजले इमारत उभारण्यासाठी हाय राइज समितीपुढे जाण्याची गरज नाही