पुणे, ता. ११ ः मेट्रोच्या एलिव्हेटेड कॉरीडॉरवर फायबर ऑप्टिक्सचे नेटवर्क खासगी टेलिकॉमला भाड्याने देणे, मोबाईल टॉवर उभारणीसाठी स्थानक आणि डेपोच्या इमारतींवर जागा भाड्याने देणे आदी उपाययोजना करून महामेट्रो आगामी काळात उत्पन्न वाढीसाठी (नॉन फेअर बॉक्स रेव्हेन्यू) प्रयत्न करणार आहे. त्यासाठी विविध योजना महामेट्रोने तयार केल्या असून, त्यात खासगी उद्योग, व्यावसायिकांना सामावून घेतले जाणार आहे.
शहर आणि पिंपरी चिंचवडमधील मेट्रो प्रकल्पाच्या देखभाल दुरुस्तीसाठी मोठा खर्च येतो. तिकीट विक्रीतून मिळणारे उत्पन्न हे या एकूण खर्चाच्या केवळ ५० टक्के उद्दिष्ट आहे. उर्वरित ५० टक्के निधीची तूट भरून काढण्यासाठी ‘नॉन-फेअर बॉक्स रेव्हेन्यू’ महत्त्वाचा ठरतो. पुणे मेट्रोला कोणत्याही सरकारी मदतीशिवाय पर्यायाने करदात्यांवर अधिक बोजा न टाकण्यासाठी भविष्यात स्वयंपूर्ण करण्यासाठी हे उत्पन्न महत्त्वाचे आहे. म्हणूनच उत्पन्नवाढीसाठी नावीन्यपूर्ण योजनांवर भर देण्यात येत असल्याचे महामेट्रोचे जनसंपर्क अधिकारी चंद्रशेखर तांभवेकर यांनी नमूद केले.
महामेट्रोने स्थानकांचे सह-ब्रँडिंग हक्कातंर्गत ११ स्थानके करारावर दिली आहेत. त्या स्थानकांना संबंधित खासगी कंपन्यांची नावे देण्यात आली आहेत. उदा. गरवारे कॉलेज, फुगेवाडी, पुणे रेल्वे स्टेशन, रूबी हॉल क्लिनिक आणि कल्याणीनगर या स्थानकांसाठी कंत्राटे दिली गेली आहेत, तसेच बजाज जनरल इन्शुरन्स, बजाज फिनसर्व्ह, रूबी हॉल क्लिनिक, माणिकचंद समूह, सह्याद्री हॉस्पिटल्स, जंबोकिंग, नुरिशिंग फार्म्स, चितळे बंधू, सँडविक कोरोमँट आदी कंपन्याही महामेट्रोशी संलग्न आहेत. मेट्रोच्या स्थानक परिसरात, मेट्रोच्या खांबांवर, पादचारी पुलांवर आणि मेट्रो ट्रेनच्या आत-बाहेर जाहिरातींसाठी जागा भाड्याने देऊन त्यातून उत्पन्न मिळवले जाते, तसेच विविध मेट्रो स्थानकांवर व्यावसायिकांनाही व्यवसायासाठी अल्प कालावधीसाठी जागा भाड्याने दिल्या आहेत, असे त्यांनी नमूद केले.
----------------
२०२५ मध्ये २० कोटींचा महसूल
मेट्रो प्रशासनाच्या अखत्यारीत असणाऱ्या जागा व्यवसायासाठी भाड्याने देणे, मेट्रो स्थानक परिसरात दुकाने, किऑस्क आणि ‘एटीएम’साठी जागा भाड्याने देऊन त्यातून उत्पन्न मिळवले जाते, तसेच स्थानक व डेपोच्या इमारतींच्या वरच्या किंवा आसपासच्या मोकळ्या जागांवर व्यावसायिक बांधकाम करून त्या भाडेतत्त्वावर देऊन त्यातून उत्पन्न मिळवले जात आहे. या उपक्रमांतून महामेट्रोला २०२४-२५ मध्ये १९ कोटी ८० लाख रुपये महसूल मिळाला आहे, तर २०२५-२६ मध्ये अंदाजे २१ कोटी रुपये उत्पन्न अपेक्षीत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.