राधिका वळसे पाटील ः सकाळ वृत्तसेवा
जयपूर, ता. १२ : येथील विधानभवनात तयार केलेले अत्याधुनिक डिजिटल संग्रहालय म्हणजे राजस्थानच्या समृद्ध इतिहास आणि वारशाचे आधुनिक रूपात संरक्षण करण्याचा प्रयत्न आहे. संस्थानिक राजेशाहीपासून लोकशाहीपर्यंतचा प्रवास, स्वातंत्र्यपूर्व चळवळी, पहिली विधानसभा, प्रमुख नेत्यांचे योगदान, विधिमंडळाची कार्यपद्धती, निवडणूक प्रक्रिया, संविधान रचना तसेच राजस्थानातील राजकीय प्रवासाचे जिवंत दर्शन घडविण्यात आले आहे.
या सर्वांचा दृश्य, ध्वनी आणि तांत्रिक माध्यमातून केलेला सजीव दस्तऐवज येथे अनुभवायला मिळतो. थ्री-डी प्रोजेक्शन, व्हर्च्युअल रिअॅलिटी, होलोग्राम्स आणि इंटरॅक्टिव्ह किओस्क्सच्या साहाय्याने राजस्थानने आपल्या राजकीय वारशाचे डिजिटल स्वरूपात संवर्धन केले आहे.
संग्रहालय दोन मजल्यांवर विभागले असून ‘अपर ग्राउंड फ्लोअर’वर राजस्थानच्या राजकीय इतिहासाची ओळख करून देणारे विभाग आहेत. प्रोजेक्शन मॅपिंग, व्हर्च्युअल रिअॅलिटी, इंटरॅक्टिव्ह किओस्क्स आणि होलोग्राम्सद्वारे प्रत्येक घटक सजीव पद्धतीने सादर केला आहे. ‘लोअर ग्राउंड फ्लोअर’वर विधानसभा अध्यक्ष, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते आणि माजी सदस्यांच्या जीवनप्रवासाचे डॉक्युमेंटेशन आहे. विधानसभेची कार्यपद्धती, विधेयक मांडणी व पारित होण्याची प्रक्रिया हेही आकर्षक व्हिज्युअल मॉडेलद्वारे दाखविण्यात आले आहे. तसेच स्वतंत्र विभागांमध्ये राजस्थानच्या सामाजिक सुधारणा, महिला सक्षमीकरण, निवडणुका आणि राज्यघटनेच्या महत्त्वाच्या कलमांवर माहितीपर व्हिडिओ दाखवले जातात. संग्रहालयात विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात्मक कोपरेही तयार करण्यात आले आहेत.
पुढील पिढ्यांना राजस्थान विधान भवनातील हे संग्रहालय म्हणजे केवळ राजकीय इतिहासाचा दस्तऐवज नाही, तर लोकशाही मूल्यांचा अनुभव देणारे, राज्याचा लोकशाही वारसा शिकवणारे ‘जिवंत दालन’ आहे. विद्यार्थ्यांपासून ते पर्यटकांपर्यंत सर्वांसाठी हे ठिकाण इतिहास, तंत्रज्ञान आणि प्रेरणादायी नेतृत्वाचा संगम ठरणार आहे.
हे म्युझियम फक्त राजकीय माहिती देणारे नाही, तर जनतेला भूभागीय राजकारण, विधानसभेतील कार्यप्रणाली आणि स्वातंत्र्योत्तर काळातील सामाजिक-आर्थिक बदल समजून घेण्याचे दालन आहे. त्यामुळे विद्यार्थी, इतिहास-राजनीती प्रेमी व स्थानिक पर्यटकांसाठी एक उपयुक्त ठिकाण ठरेल.
---------------
फोटो ः 67434
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.