पुणे, ता. १३ ः पुणे महापालिकेत मनुष्यबळाचा तुटवडा असल्याने भरतीप्रक्रिया राबविली जाते. त्यापूर्वी विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत आरक्षणाच्या जागा निश्चित करण्यासाठी बिंदू नामावली तपासून घेतली जाते. यासाठी महापालिकेने २०२४, २०२५ मध्ये २६ पदांचे प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयातील मागासवर्ग विभागाकडे पाठवले असून, त्यापैकी एकही प्रस्ताव तपासून महापालिकेकडे आलेला नाही. त्यामुळे तब्बल २६२ पदांची भरती रखडली आहे.
पुणे महापालिकेतच २०१२ पासून पदभरतीला बंदी घालण्यात आलेली होती. २०२२ मध्ये ही पदभरतीवरील बंदी मागे घेण्यात आली. १० वर्षांच्या काळात वर्ग एक ते चारमधील अनेक अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्त झाले. अनेकांना पदोन्नती देण्यात आली. त्यामुळे या रिक्त झालेल्या जागांवर नव्याने भरती करणे आवश्यक होते; पण पदभरती न झाल्याने महापालिकेत मनुष्यबळाचा चांगलाच तुटवडा निर्माण झालेला आहे. दैनंदिन कामकाज सुरू ठेवण्यासाठी वर्ग चार आणि वर्ग तीनचे कर्मचारी हे ठेकेदाराच्या माध्यमातून कंत्राटी पद्धतीने भरण्यास सुरुवात केली आहे. सध्या महापालिकेत सुमारे १० हजार कंत्राटी कर्मचारी आहेत.
२०२२ मध्ये राज्य सरकारने भरती प्रक्रियेवरील बंदी उठविल्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयाकडून बिंदू नामावली (रोस्टर) तपासून घेऊन भरतीची प्रक्रिया सुरू केली. गेल्या अडीच वर्षांत कनिष्ठ अभियंता, लिपिक, सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक, अग्निशामक दलाचे जवान असे सुमारे ८८५ पदांची भरती पार पाडलेली आहे. सध्या १७१ कनिष्ठ अभियंत्यांची भरती सुरू आहे. महापालिकेत वर्ग तीनच्या कर्मचाऱ्यांची मोठी गरज भासत आहे. त्यासाठी महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने वर्ग तीनच्या २६ पदांच्या २६२ जागांची बिंदू नामावली तपासून देण्यासाठी प्रस्ताव पाठवले आहेत. यामध्ये उद्यान निरीक्षक-पर्यवेक्षक, सर्वेअर, यंत्र परिचर (वेब ऑफसेट बॉलर), कनिष्ठ बायंडर, संगणक प्रोग्रॅमर, कनिष्ठ अभियंता सॉफ्टवेअर, कनिष्ठ अभियंता हार्डवेअर, कनिष्ठ अभियंता नेटवर्क, मिस्त्री, लघुटंकलेखक, लघुलेखक, उपअधीक्षक आदी पदांचा समावेश आहे. यामध्ये मिस्त्री या पदाच्या १०६ जागांचा समावेश आहे. हे सर्व प्रस्ताव २०२४ आणि २०२५ वर्षात पाठविण्यात आले आहेत.
अभियंत्यांचा निर्णय प्राधान्याने
पुणे महापालिकेत अभियंत्यांची संख्या कमी आहे. त्यांची १७१ जागांची भरती सुरू आहे. याचा प्रस्तावही मागासवर्ग विभागाकडे प्रलंबित होता. त्याचा पाठपुरावा करून त्याची बिंदू नामावली प्राधान्याने तपासून घेण्यात आली आहे. त्यामुळे त्याची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.
पुणे महापालिकेत प्रशासकीय कामासाठीच्या पदांची भरती करण्यासाठी बिंदू नामावली तपासून घेण्याचे प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयातील मागासवर्ग विभागाकडे पाठवले आहेत. त्यास लवकरात लवकर मंजुरी मिळावी, यासाठी पाठपुरावा सुरू आहे. आरोग्य विभागातील महत्त्वाच्या काही पदांना बिंदू नामावलीची गरज नाही, अशा पदांच्या भरतीची मंजुरी घेण्यासाठी आयुक्तांकडे प्रस्ताव पाठवला आहे.
- विजयकुमार थोरात, उपायुक्त, सामान्य प्रशासन विभाग
पद आणि जागा
उद्यान निरीक्षक - १०
सहाय्यक पशुधन पर्यवेक्षक - २
मत्स्यालय पर्यवेक्षक - १
रंगारी सजावट - ३
प्रदूषण निरीक्षक - १
सर्वेअर - २३
पशुधन पर्यवेक्षक - २
सहाय्यक व्यवस्थापक (मुद्रणालय) - २
प्लेट मेकअर-कॅमेरा ऑपरेटर - १
यंत्र परिचर - ४
मेकॅनिक -१
ज्युनियर बायंडर - २०
कंपोझिटर - ३
हेल्पर -६
बॉलर - ६
कनिष्ठ अभियंता सॉफ्टवेअर -३
कनिष्ठ अभियंता हार्डवेअर -२
कनिष्ठ अभियंता नेटवर्क - २
संगणक प्रोग्रॅमर - १०
संगणक ऑपरेटर -५
संगणक चालक - १०
लघुलेखक -३
लघुटंकलेखक - ३२
उप अधीक्षक - १
ब्राडमा ऑपरेटर - १
मिस्त्री - १०६