पुणे, ता. १९ : पुण्यात थंडीचा कडाका वाढत असून, सकाळी शहराच्या विविध भागांत दाट धुक्याची चादर पसरत आहे. तरीही पुणे विमानतळावरील सेवा बाधित झाली नसली तरीही विमानतळ प्रशासनाने खबरदारी म्हणून धुके व्यवस्थापन (फॉग मॅनेजमेंट) अंतर्गत उपाययोजना केल्या आहेत. प्रवाशांच्या गर्दीचे व्यवस्थापन ते कमी दृश्यमानतेत उपयोगी पडणारी नियमावली (एलव्हीपी) लागू केली आहे. त्यामुळे धुक्यातही विमानांचे सुरक्षित लँडिंग होत आहे.
पुणे विमानतळ प्रशासनाची विमान कंपन्या, हवाई नियंत्रण कक्ष, खाद्यपदार्थ विक्रेते व केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलासमवेत (सीआयएसएफ) नुकतीच बैठक झाली. यात विमान कंपन्यांना काही सूचना देण्यात आल्या आहेत. संबंधित कंपनीच्या विमानाला उशीर होत असेल तर त्या कंपनीने प्रवाशांना किमान तीन तास आधीच उशीर होण्याबद्दलची माहिती द्यावी. विमानाला उशीर होऊन प्रवाशांची गर्दी झाल्यास त्यांच्या बसण्यासाठी अतिरिक्त आसन व्यवस्था तयार करणे. यासाठी २०० प्रवाशांची व्यवस्था केली आहे. खाद्यपदार्थ विक्रेत्यांना अतिरिक्त खाद्य उपलब्ध ठेवण्याच्याही सूचना दिल्या आहेत. प्रवाशांचे ‘चेक इन’ व अन्य सुरक्षासंदर्भात तपासणीसाठी ‘सीआयएसएफ’चे अतिरिक्त मनुष्यबळ वापरले जाणार आहे.
धावपट्टी २८ वर ‘आयएलएस’ सज्ज
पुणे विमानतळाच्या धावपट्टी क्रमांक २८ वर कॅट-दोन ‘आयएलएस’ (इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीम) प्रणाली कार्यान्वित आहे. यामुळे धावपट्टीवरची दृश्यमानता ३०० मीटरपर्यंत कमी असतानाही विमानांना सुरक्षितपणे उतरता येते. धावपट्टी १० वर ही प्रणाली नाही. त्यामुळे ‘एटीसी’ विमान उतरविताना अनेकदा २८ क्रमांकाची धावपट्टी वापरावी, अशा सूचना वैमानिकांना देतात.
‘एलव्हीपी’ कार्यान्वित
धावपट्टीवर दृश्यमानता ८०० मीटरपेक्षा कमी झाल्यावर ‘लो व्हिजिबिलिटी प्रोसिजर्स’ (एलव्हीपी) लागू होते. हवाई वाहतूक नियंत्रण कक्षा (एटीसी) कडून ते लागू केले जाते. या विशेष कार्यपद्धतीमुळे कमी दृश्यमानतेत विमानांचे सुरक्षित परिचालन केले जाते. यात धावपट्टी आणि ‘टॅक्सी वे’वर विमानांची संख्या नियंत्रित केली जाते. दोन विमानांमधील आणि ‘टॅक्सी वे’वर वाहनांमधील अंतर वाढवले जाते. जेणेकरून अपघात होऊ नये. यामुळे विमानांना उशीर होतो, मात्र सुरक्षितता वाढते.
धुक्यामुळे विमानसेवा अनेकदा बाधित होते. याचा थेट परिणाम प्रवासी सेवेवर होतो. प्रवासी सुरक्षेसाठी व विमानसेवा कमी प्रमाणात बाधित होईल, या अनुषंगाने विमानतळावर धुक्याच्या व्यवस्थापनाअंतर्गत बैठक घेऊन आवश्यक त्या उपाययोजना आखल्या आहेत.
- संतोष ढोके, विमानतळ संचालक, पुणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.