पुणे, ता. १९ : देशातील ६० प्रमुख रेल्वे स्थानकांवर प्रवाशांसाठी आता कायमस्वरूपी प्रतीक्षा क्षेत्र (होल्डिंग एरिया) असणार आहे. यात पुण्यासह मध्य रेल्वेच्या सहा स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. प्रवाशांच्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी हे ‘प्रतीक्षा क्षेत्र’ उपयोगी ठरतील. पुणे स्थानकाच्या पार्सल कार्यालयाजवळ सध्याचे प्रतीक्षा क्षेत्र आहे मात्र, याचे क्षेत्र मर्यादित स्वरूपाचे आहे. हे क्षेत्र वाढविण्यासाठी लवकरच अतिरिक्त जागेची उपलब्धता करण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेतील पुणे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी), नागपूर, कल्याण व नाशिक या सहा स्थानकांचा देशातील ६० स्थानकांच्या यादीत समावेश होण्याची शक्यता आहे. या स्थानकावरून प्रवास करणाऱ्याची संख्या सर्वात जास्त आहे. पुणे स्थानकावरून आता दररोज सुमारे एक लाख ७० हजार प्रवासी प्रवास करतात. सण व उत्सवांच्या काळात ही संख्या दोन लाखांच्या घरात जाते. त्यामुळे पुणे स्थानकावर प्रवाशांसाठी स्वतंत्र प्रतीक्षा क्षेत्र असणे अत्यंत आवश्यक आहे.
सध्याचे प्रतीक्षा क्षेत्र अपुरे
- दिवाळीच्या काळात उत्तर भारतात जाणाऱ्या गाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी अधिक असते
- प्रशासनाकडून एक ते दीड हजार प्रवासी बसू शकतील, एवढ्या जागेतच प्रवाशांना बसविले जाते
- गोंधळ टाळण्यासाठी फलाटावर रेल्वे आल्यावर प्रवाशांना रांगेने सोडले जाते
- एक ते दोन रेल्वेच्या बाबतीतच मात्र अशी उपाययोजना करण्यात येते
- अचानक गर्दी वाढल्यास त्याचे नियंत्रण करण्यासाठी रेल्वेकडे कोणतीही यंत्रणा नाही
यार्डची जागा संपादन करणार
- प्रतीक्षा क्षेत्रासाठी आणखी काही प्रमाणात जागेची आवश्यकता आहे
- पुणे स्थानकाच्या यार्ड पुनर्रचनेनंतर काही प्रमाणात मोकळी जागा होणार आहे
- त्या ठिकाणी कायमस्वरूपी प्रतीक्षा क्षेत्र निर्माण केले जाईल
- पुणे स्थानकावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता हे प्रतीक्षा क्षेत्र तयार करणे आवश्यक आहे
गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रतीक्षा क्षेत्र तयार केले जाणार आहे. देशातील ६० स्थानकांमध्ये मध्य रेल्वेच्या सहा स्थानकांचा समावेश होऊ शकतो. ज्या स्थानकांवर पुरेशी जागा नाही, त्या ठिकाणी आम्ही अतिरिक्त जागा घ्यावी लागू शकते.
- डॉ. स्वप्नील नीला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मुंबई
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.