पुणे, ता. १९ : ‘‘आम्ही आमच्या विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आणि जिंकण्यासाठी स्पर्धेत सहभागी झालो आहोत. विद्यार्थी संख्येनुसार निवासाची पुरेशी सोय नसल्याने गैरसोय होत आहे. एकदा मैदानात उतरल्यावर स्पर्धा झाली तरीही जेवणाची पुरेशी व्यवस्था नसल्याने दिवसभर मैदानात थांबावे लागत आहे. काहीवेळा उपाशीपोटी क्रीडा स्पर्धेत खेळावे लागत आहे,’’ असा अनुभव अनिता पवार (नाव बदललेले आहे) महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सवात सहभागी झालेल्या विद्यार्थिनीने सांगितला.
गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठात २६ वा महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव होत आहे. हा महोत्सव सोमवारी सुरू झाला असून येत्या शनिवारपर्यंत (ता. २२) येथे विविध स्पर्धा होणार आहेत. क्रीडा महोत्सवात राज्यातील २३ विद्यापीठांमधील जवळपास साडेचार हजारांहून अधिक खेळाडू, विद्यार्थी सहभागी झाले आहेत. महोत्सवांतर्गत ॲथलेटिक्स, बॅडमिंटन, टेबल टेनिस, बुद्धिबळ, खो-खो, व्हॉलिबॉल, कबड्डी, बास्केटबॉल या आठ क्रीडा प्रकारांतील स्पर्धा होणार आहेत. यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील १५० खेळाडू आणि २५ संघ व्यवस्थापक आणि मार्गदर्शकांचा गट सहभागी झाला आहे. विद्यापीठातील विद्यार्थी महोत्सवाच्या ठिकाणी गेले असता, त्यांच्या निवासाची सोय उशिराने झाली. तसेच, विद्यार्थ्यांच्या जेवणाची गैरसोय होत आहे. महोत्सवात निवास, जेवणाची व्यवस्था पाहणाऱ्या समित्यांचा गोंधळ उडाल्याचा अनुभव विद्यार्थ्यांनी सांगितला.
अशी भरविली जाते स्पर्धा
दरवर्षी भरविण्यात येणाऱ्या या क्रिडा महोत्सवासाठी संबंधित विद्यापीठांतील विद्यार्थी संख्येनुसार ‘प्रो-रेटा’ निधी संबंधित महोत्सवासाठी दिला जातो. त्यानुसार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जवळपास ४७ लाखांहून अधिक रुपये ‘प्रो-रेटा’ निधी म्हणून महोत्सवासाठी संबंधित व्यवस्थापनाकडे जमा केले आहेत. अशाच पद्धतीने प्रत्येक विद्यापीठाकडून हा निधी जमा केला जातो. त्यातून या क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले जाते.
विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्या
- निवासाची पुरेशी व्यवस्था नसणे
- निवास आणि मैदानापर्यंत वाहतूक व्यवस्थेचा अभाव
- जेवणाचे गैरव्यवस्थापन
क्रीडा महोत्सवात विद्यार्थी, खेळाडूंची गैरसोय होत असल्याची वस्तुस्थिती आहे. यासंदर्भात गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू, कुलसचिव यांच्याशी चर्चा केली आहे. विद्यार्थ्यांना कोणतीही गैरसोय होणार नाही, असे आश्वासन प्रशासनाने दिले आहे. तरी देखील विद्यार्थ्यांची व्यवस्थित सोय व्हावी, यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे.
- डॉ. सुदाम शेळके, सहाय्यक संचालक, क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.