ब्रिजमोहन पाटील ः सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. ११ ः पुणे महापालिकेतील झाडणकामाच्या निविदेतील घोळ समोर आल्यानंतर आता झाडणकासाठी कंत्राटी कामगार घेताना त्यांच्याकडून मुकादमाच्या माध्यमातून २० हजारांपासून एक लाख रुपयांपर्यंत लाच घेतली जात आहे. अनेकांनी नोकरी मिळेल, या आमिषाने खासगी सावकारांकडून कर्जे घेतली आहेत. पण आता या कर्मचाऱ्यांना वेळेवर पगारही नाही, पैशाची विचारणा केल्यावर दादागिरी केली जात असल्याने आर्थिक पिळवणूक होत आहे. या पैसे वसुलीतला काही हिस्सा क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांपर्यंत पोचत असल्याने प्रशासन तक्रारींकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप होत आहे.
पुणे महापालिकेच्या हद्दीतील रस्ते झाडण्यासाठी सुमारे साडेसात हजार कर्मचाऱ्यांच्या जागांपैकी तीन हजार ४५६ जागा रिक्त आहेत. त्यामुळे या कामाला मनुष्यबळ कमी होत असल्याने कंत्राटी कामगारांकडून झाडणकाम करून घेतले जाते. सध्या चार हजार ९२९ कर्मचारी आहेत. या कामगारांसाठी महापालिका दरवर्षी सुमारे दीड कोटी रुपयांपर्यंत खर्च करते.
मुकादमाच्या हातात कारभार
क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत झाडणकामासाठी आरोग्य कोठी अंतर्गत बिट्स तयार केले आहेत. त्यानुसार प्रत्येक कर्मचाऱ्याने सकाळी सहा ते दुपारी दोनपर्यंत ठरवून दिलेले रस्ते झाडतात. या सर्व कर्मचाऱ्यांवर तेथील मुकादमाचे व त्याचे व्यवहार पाहणाऱ्या कर्मचाऱ्याचे नियंत्रण असते. मुकादमावर आरोग्य निरीक्षक व वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, सहाय्यक आयुक्तांचे नियंत्रण असते. कर्मचाऱ्यांची हजेरी लावणे, त्यांनी कामे व्यवस्थित केली आहेत की नाही, हे तपासण्याची जबाबदारी मुकादमाची आहे. त्याऐवजी मुकादमाची मनमानी सुरू असल्याने कर्मचाऱ्यांकडून हजेरीसाठी पैसे घेणे, काम न करता पगार काढणे, त्याबदल्यात संबंधित कर्मचाऱ्यांकडून अर्धा पगार घेणे, कामावरून काढून टाकण्याची धमकी देणे, शिवीगाळ करणे असे प्रकार शहरात सर्रास घडत आहेत.
पोलिसांच्या चौकशीतही पैसे घेतल्याचे स्पष्ट
सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत एका प्रभारी मुकदमाच्या हद्दीत एक महिला दुकानदारांकडून पैसे वसूल करत होती. तिला मज्जाव केल्याने या दोघांत वाद झाला. त्यामुळे या महिलेने प्रभारी मुकादमाच्या विरोधात सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात विनयभंगाची तक्रार दाखल केली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत प्रभारी मुकादमाने चुकीचे वर्तन केले नसल्याने स्पष्ट झाले व महिलेची तक्रार दप्तरी दाखल करण्याचा प्रस्ताव पोलिस आयुक्त कार्यालयात पाठवला. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात साक्षीदार म्हणून महिलांची चौकशी केली असताना तक्रारदार महिलेनेच कामाला लावून देते म्हणून २० ते ३० हजार रुपये घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. तसे पोलिसांनी या प्रस्तावात नमूद केले आहे. तरीही क्षेत्रीय कार्यालयांनी कामात सुधारणा केलेली नाही.
सर्वच ठिकाणी अंदाधुंद कारभार
महापालिकेच्या सर्व १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत झाडणकामात अंदाधुंद कारभार सुरू आहे. रस्ते झाडण्याचे काम पूर्ण न करता हजेरी लावली जात आहे. अनेक जण कामावर येत नसतानाही पगार घेतला जातो, त्यातील अर्धा पगार मुकादम व अन्य कर्मचाऱ्यांना मिळत आहे. या चुकीच्या प्रकारांना त्यात आरोग्य निरीक्षकांकडून मुकदमांना बळ दिले जात असून दर महिन्याला यातून लाखो रुपयांची कमाई होत आहे. शिवाय जो तक्रार करतो त्याला कामावरून काढले जाते, पगार दिला जात नसल्याने अशिक्षित व गरीब कामगार यांच्या दबावाला बळी पडत आहेत, असे एका कंत्राटी कामगाराने ‘सकाळ’ला सांगितले.
कंत्राटी कामगारांना नोकरीवर घेण्यासाठी मुकादम व अन्य व्यक्तींच्या माध्यमातून पैसे घेणे चुकीचे आहे. हा प्रकार आमच्या निदर्शनास आलेला नव्हता. पण यामध्ये लक्ष घालून कारवाई केली जाईल. तसेच महापालिकेच्या कायम सेवेत असलेल्या मुकादमांच्या बदल्या करून कामात सुधारणा केली जाईल.
- पृथ्वीराज बी. पी., अतिरिक्त आयुक्त, महापालिका
क्षेत्रीय कार्यालय व झाडणकाम करणाऱ्या कंत्राटी कामगारांची संख्या
हडपसर मुंढवा -७०३
औंध बाणेर - ४१९
कसबा विश्रामबाग - ५६
कोंढवा येवलेवाडी - ३१५
वारजे कर्वेनगर - ३४६
सिंहगड रस्ता - ४८६
धनकवडी सहकारनगर - ३९७
नगर रस्ता वडगाव शेरी - ७४३
येरवडा कळस धानोरी - ३१५
कोथरूड बावधन - २८१
ढोले पाटील - २१६
शिवाजीनगर घोले रस्ता - १२५
बिबवेवाडी - २२२
वानवडी रामटेकडी - ३०१
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.