पुणे, ता. ६ ः फळे, फुले प्रदर्शनावर दरवर्षी कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करणाऱ्या महापालिका प्रशासनाला छत्रपती संभाजीराजे उद्यानातील गैरसोई दूर करण्याचा मात्र विसर पडू लागला आहे. उद्यानात पडून असलेली माती, वाळूचे ढिगारे, विटा, बांधकामाचे साहित्य, नांगरणीमुळे उचकटलेली माती नागरिकांच्या अक्षरशः व्यायामात अडथळे ठरत आहे. पॅगोडामध्ये माणसांसह श्वानांकडून घाण केली जाते. दररोज सकाळी फिरायला, व्यायामाला येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांवर हातात झाडू येऊन पॅगोडा स्वच्छ करण्याची वेळ येत आहे.
जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजीराजे उद्यानामध्ये शहराच्या मध्यवर्ती भागातील पेठा, डेक्कन, शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी, वाकडेवाडी, फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यासह विविध भागांतील तरुण-तरुणी, ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी दररोज मोठ्या संख्येने व्यायाम, चालणे, अभ्यासासाठी येतात. मत्स्यालय पाहण्यासाठी लहान मुलांची गर्दी कायम असते. मेट्रोस्थानक व बसथांब्यावरील प्रवासी, पर्यटकांची वर्दळ सुरू असते. तरीही या उद्यानातील स्वच्छता व सोई-सुविधांकडे दुर्लक्ष होत आहे. या समस्यांबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने नागरिक रामचंद्र महामुनी, हेमंत हिरवे, संजय पटवर्धन, डॉ. मंगेश बनकर, डॉ. सुहास जोशी, महेश तळेगावकर, योगेश हिवरकर यांनी सांगितले.
अशी आहे स्थिती
- महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त कोट्यवधी रुपये खर्च करून फळे, फुले व वृक्ष प्रदर्शन उद्यानात दरवर्षी भरविले जाते
- यंदाचे प्रदर्शन होऊन एक महिना उलटला, मात्र अजूनही तेथे दगड-मातीचे ढिगारे, विटा, ब्रिकेट पडून
- उद्यानाच्या डावीकडील बाजू नांगरण्यात आली असून, त्यामुळे नागरिकांना व्यायाम करण्यास मर्यादा
- मातीचे ढिगारे हटविलेले नाहीत
- सजावटीच्या वस्तू, कुंड्या, विद्युत पोल, थर्माकोल अस्ताव्यस्त पडलेले
- बांधकामाचे तराफे, वाळू व कचऱ्याचे ढिगारे जॉगिंग ट्रॅकवर पडून
- पॅगोडामध्ये श्वानांकडून विष्ठा, लघुशंका
- खाद्यपदार्थ, कागद, प्लास्टिक, पिशव्या, पाणी, शीतपेयांच्या बाटल्या पॅगोडामध्येच
- तेथे साफसफाई नसते. ते पाणी टाकून धुतले जात नाही
- पाण्याची टाकी स्वच्छ केली जात नाही
- महापालिकेची वाहने उद्यानात प्रदूषण करत असल्याचे दररोजचे चित्र
छत्रपती संभाजीराजे उद्यानातील स्वच्छता व सुविधांकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे. पुरुषांचे स्वच्छतागृह अस्वच्छ, तर महिलांचे स्वच्छतागृह सकाळी बंद असते. महापालिका आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्याकडे तक्रार करणार आहोत.
- रामचंद्र महामुनी, निवृत्त उपजिल्हाधिकारी
उद्यानात सकाळी ८ ते दुपारी ४.३० या वेळेत स्वच्छता केली जाते. मातीचे ढिगारे पसरवून त्यावर गवत लावले जाणार आहे. पॅगोडामधील अस्वच्छता टाळण्यासाठी रात्रीच्यावेळी तो बंद करून सकाळी आठ वाजता स्वच्छता केली जाईल.
- प्रीती सिन्हा, उद्यान अधीक्षक, महापालिका पुणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.