पुणे, ता. १८ ः प्रयोग क्रमांक १३,३३३! हा प्रयोगाचा आकडा फार तर वर्षानुवर्षे सुरू असलेल्या एखाद्या नाटकाचा असावा, असा समज होऊ शकतो. मात्र, कोणत्या नाटकाचा नव्हे; तर एका नटाच्या वैयक्तिक नाट्यप्रयोगांचा हा अचंबित करणारा आकडा आहे. हा नट म्हणजे अर्थातच मराठी रंगभूमीवरचे ‘विक्रमादित्य’ प्रशांत दामले! येत्या १६ नोव्हेंबरला ते आपला विक्रमी १३,३३३ वा नाट्यप्रयोग सादर करणार आहेत.
रंगभूमीचा समृद्ध वारसा लाभलेल्या मराठीजनांना अभिमान वाटावा, अशी ही घटना आहे. ही गौरवशाली अन् विक्रमी घटना साजरी करण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रयोगानिमित्त १४ ते १६ नोव्हेंबर दरम्यान ‘हाऊसफुल्ल प्रशांत दामले महोत्सव’ होणार आहे. यात दामले यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ आणि ‘शिकायला गेलो एक’ अशा दोन नाटकांचे प्रयोग होणार आहेत. १६ नोव्हेंबरला सायंकाळी ४.३० वाजता बालगंधर्व रंगमंदिरात होणाऱ्या विक्रमी १३,३३३ व्या नाट्यप्रयोगाने महोत्सवाची सांगता होणार आहे. या विक्रमी प्रयोगाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असून, यावेळी दामले यांची प्रकट मुलाखतही होणार आहे. विशेष म्हणजे, या महोत्सवात १५ नोव्हेंबरला होणारा ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ नाटकाचा प्रयोग हा या नाटकाचा ८०० वा प्रयोग असणार आहे.
एखाद्या नटाची वैयक्तिक प्रयोग संख्या काही हजारांच्या घरात असण्याची उदाहरणे मराठीतच नव्हे; तर जागतिक रंगभूमीवरही अतिशय दुर्मिळ आहेत. दामले मात्र अशा सर्व नियमांना अपवाद आहेत. गेल्या ४३ वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनोरंजनाचा निखळ वसा हाती घेऊन ते अविरतपणे प्रयोग सादर करत आहेत. विशेष म्हणजे, ४० वर्षांपूर्वी सादर केलेल्या ‘टूरटूर’ नाटकाच्या प्रयोगातील त्यांची ऊर्जा आणि प्रत्येक प्रयोग नव्याने सादर करण्याची ऊर्मी आजच्या ‘शिकायला गेलो एक’ या नाटकातही कायम दिसते. कामाच्या उद्देशाविषयी स्पष्टता आणि शिस्तबद्धतेने बहरलेली त्यांची कारकीर्द अनेक विक्रमांनी आणि प्रयोगांनी झळाळून उठली आहे. त्यांच्या कारकिर्दीचा सन्मान ‘सकाळ’तर्फे आयोजित या महोत्सवातून होणार आहे.
----
तिकिटविक्री सुरू
या संपूर्ण महोत्सवाची, तसेच १६ नोव्हेंबरला होणाऱ्या विक्रमी १३,३३३ व्या प्रयोगाची तिकीटविक्री सुरू झाली आहे. ही तिकिटे bookmyshow.com आणि tikitalay.com या संकेतस्थळांवर उपलब्ध आहेत. इच्छुक रसिकांनी लवकरात लवकर तिकिटे आरक्षित करावीत, असे आवाहन ‘सकाळ’ने केले आहे.
----
महोत्सवाचे वेळापत्रक ः
१४ नोव्हेंबर ः शिकायला गेलो एक - सायंकाळी ५ वाजता - यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड
१५ नोव्हेंबर ः एका लग्नाची पुढची गोष्ट - सायंकाळी ५ वाजता - बालगंधर्व रंगमंदिर, जंगली महाराज रस्ता
१५ नोव्हेंबर ः शिकायला गेलो एक - रात्री ९ वाजता - रामकृष्ण मोरे सभागृह, चिंचवड
१६ नोव्हेंबर (विक्रमी १३,३३३ प्रयोग) - शिकायला गेलो एक - सायंकाळी ४.३० वाजता - बालगंधर्व रंगमंदिर, जंगली महाराज रस्ता
फोटो ः 61075
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.