पुणे, ता. २८ : महापालिकेच्या अजब कारभाराचा फटका महापालिकेचे कर्मचारी असलेल्या आणि रस्ता रुंदीकरणातील बाधितांचे पुनर्वसन केलेल्या ४६ रहिवाशांना बसला आहे. महापालिकेच्या मालकीची जुनी झालेली इमारत पाडून तेथे नवीन इमारत बांधण्याची निविदा काढून काम दिले. रहिवाशांचे तात्पुरते स्थलांतरही केले; परंतु जागेची मालकी नेमकी कोणाची? याचा घोळ समोर आल्याने दोन वर्षांपासून इमारतीचे काम सुरू होऊ शकले नाही. त्यामुळे ‘आमचे पुनर्वसन कधी होणार’, असा सवाल येथील रहिवाशांनी उपस्थित केला आहे.
नाना पेठेतील राजेवाडी येथे १९६० मध्ये महापालिकेने कॉलनी बांधली आहे. यामध्ये ४६ रहिवासी आहेत. इमारतीची दुरवस्था झाल्याने २०१३ मध्ये पुनर्विकास करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. सर्व प्रक्रिया पूर्ण करून निविदा काढून एका ठेकेदार कंपनीला कामही दिले. एवढेच नव्हे, तर तेथील रहिवाशांचे जवळच असलेल्या एका एसआरए प्रकल्पामध्ये तात्पुरते स्थलांतर केले. मात्र, दोन वर्षे झाले तरी पुनर्विकासाचे काम सुरू झाले नाही.
यासंदर्भात तेथील रहिवासी तुषार रत्नपाल म्हणाले, ‘‘साडेसतरा गुंठ्यांवर या इमारती आहेत. त्यापैकी महापालिकेच्या मालकी हक्काची जागा केवळ साडेचार गुंठेच आहे. असे असताना महापालिकेने संपूर्ण जागेवर पुनर्वसन इमारती बांधण्याची निविदा काढून एका कंपनीला काम दिले. हे काम दिल्यानंतर प्रत्यक्षात जागेच्या मालकी हक्काबाबतचा घोळ समोर आला. त्यामुळे ज्या कंपनीला पुनर्वसनाचे काम दिले होते, त्यांनी काम सोडले. नव्याने निविदा काढून पुन्हा एका कंपनीचे काम दिले. मात्र, अद्यापही काम सुरू झाले नाही. निविदा काढण्यापूर्वी जागेच्या मालकी हक्काबाबत महापालिकेने माहिती का घेतली नाही. यामध्ये चूक कोणाची आहे. जागेचा तिढा कधी सुटणार आणि आमचे पुनर्वसन कधी होणार, असा आमचा प्रश्न आहे.’’
यासंदर्भात महापालिकेच्या भवन रचना विभागाचे कनिष्ठ अभियंता भीमराव खरे म्हणाले, ‘‘जागेच्या मालकीसंदर्भात मालमत्ता विभागाकडून माहिती मागविली आहे. ती अद्याप प्राप्त झालेली नाही.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.