पुणे, ता. १ : शोषितांच्या वेदना, रस्त्यावरच्या जीवनाचा कडू अनुभव आणि महानगरांतील अस्पृश्यतेविरोधात आपल्या लेखणीतून ‘विद्रोह’ करणारे प्रस्थापित मूल्यांचे बंडखोर कवी नामदेव ढसाळ यांना पुणेकरांनी अनुभवले. ‘विद्रोह’ शब्दाला नवा आशय देणाऱ्या ढसाळांच्या ओळी सभागृहात घुमल्या आणि प्रत्येक कवितेनंतर दुमदुमणाऱ्या ‘झिंदाबाद’च्या गर्जनेने सभागृहात वेगळीच ऊर्जा संचारली.
निमित्त होते, ‘साधना साप्ताहिका’च्यावतीने आयोजित ‘कोण नामदेव ढसाळ? तुही यत्ता कंची?’ या कार्यक्रमाचे. युवराज मोहिते, कवयित्री नीरजा, प्रज्ञा दया पवार, अभिनेत्री चिन्मयी सुमीत, अभिनेता-दिग्दर्शक हेमंत ढोमे, अक्षय शिंपी, दीपक राजाध्यक्ष या कलाकारांनी ढसाळ यांच्या कवितांचे अभिवाचन केले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी ऑनलाइन माध्यमातून ढसाळ यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. या वेळी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष भारत सासणे, ‘साधना साप्ताहिका’चे संपादक विनोद शिरसाठ उपस्थित होते. ढसाळ यांच्या कवितांबरोबरच त्यांची भाषणे, त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना-घडामोडींना यावेळी उजाळा देण्यात आला.
या कार्यक्रमामध्ये ढसाळांच्या ‘अंधाराने सूर्य पहिला तेव्हा’, ‘रमाबाई आंबेडकर’, ‘६ डिसेंबर’, ‘आमच्या आळीतून जाताना’, ‘माणसं भादरून पेपरवेटमध्ये कुणी बंद केलीत’, ‘त्यांची सनातन दया’, ‘ज्ञानोबा’, ‘कामाठीपुरा’, ‘मौलाना भिंडी बाजार’ अशा प्रभावी कवितांचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी कवयित्री प्रज्ञा दया पवार म्हणाल्या, ‘‘नामदेव ढसाळ हे पर्यायी साहित्याचा केंद्रबिंदू होते. त्यांच्या कवितांचा हा कार्यक्रम म्हणजे खऱ्या अर्थाने ‘सांस्कृतिक हस्तक्षेप’ आहे.’’
--------------------
सरसंघचालकाचा सल्ला स्वयंसेवकांसाठीच...
या कार्यक्रमात अभिनेते दीपक राजाध्यक्ष यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या अलीकडील वक्तव्यावर टीका केली. ते म्हणाले, ‘‘विचारपूर्वक साहित्य निर्मितीचा त्यांचा सल्ला केवळ त्यांच्या स्वयंसेवकांसाठीच उपयुक्त आहे. विचार करण्याची खरी गरज त्यांनाच अधिक आहे.’’
---------------------
फोटो ः 72560
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.