पुणे, ता. ५ ः गर्भवतींना स्वाइन फ्लूची बाधा होऊ नये, यासाठी देण्यात येणारी स्वाइन फ्लू विरोधी प्रतिबंधात्मक लस अद्याप राज्याच्या आरोग्य विभागाकडून महापालिकेच्या आरोग्य विभागाला न मिळाल्याने शहरातील हजारो गर्भवतींचे लसीकरण खोळंबले आहे. इतकेच नव्हे तर गर्भवतींबरोबरच मधुमेह, रक्तदाब अशा सहव्याधी असलेले रुग्ण आणि ६० वर्षांवरील नागरिकांनाही याची लस मोफत देण्यात येते. मात्र, लसच उपलब्ध नसल्याने सर्वाधिक जोखमीच्या गटांतील नागरिकांना आरोग्य संरक्षणापासून वंचित राहावे लागत आहे.
गर्भारपणाच्या काळात गर्भवतींची प्रतिकारशक्ती कमी होत असते. त्यांना स्वाइन फ्लूची बाधा होऊ नये, यासाठी त्यांना महापालिकेच्या दवाखान्यांतून, प्रसूतीगृहांमधून प्रतिबंधात्मक लस मोफत देण्यात येते. ही लस राज्याच्या आरोग्य विभागाकडून पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाला दरवर्षी मिळते. पाच हजार लसींची मागणीही महापालिकेने राज्याकडे केली आहे. परंतु, ती अद्याप पूर्ण न झाल्याने रुग्णसंख्येत वाढ होण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे. शहरात स्वाइन फ्लूसह इतर फ्ल्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होत असताना प्रतिबंधात्मक लस मात्र उपलब्ध होत नाही, ही बाब खेदाची ठरत आहे.
शहरात २००९ मध्ये प्रथमच ‘स्वाइन फ्लू’चा उद्रेक झाला होता. त्यावेळी १४४ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर ही साथ काही कायमची गेलेली नाही. दर दोन ते तीन वर्षांनी त्याचा उद्रेक सातत्याने होतो. २०१५, २०१९, २०२२ यावर्षी रुग्णसंख्या वाढली होती. त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आरोग्य विभागाने गर्भवती, सहव्याधी असलेले, ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व आरोग्य कर्मचारी यांना लस देण्याच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या होता. काही वर्षे हे लसीकरण करण्यात आले. मात्र, आता त्याचा आरोग्य विभागालाच विसर पडला आहे. याबाबत राज्याचे लसीकरण अधिकारी डॉ. प्रवीण वेदपाठक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
दरम्यान, खासगी रुग्णालयांमध्ये ‘स्वाइन फ्लू’च्या लसीसाठी तब्बल दोन ते अडीच हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना हा खर्च परवडत नाही. मोफत लसीचा पुरवठा बंद असल्याने या गटातील नागरिकांकडे कोणताही पर्याय राहत नाही. लस उपलब्ध नसल्याने प्रसार रोखण्याच्या प्रतिबंधात्मक रोगनियंत्रणाची साखळी कमकुवत होत असून, महापालिकेने राज्याला तातडीने पुरवठा करण्याचे गरजेचे आहे.
.............
‘‘महापालिकेच्या आरोग्य विभागाने जूनमध्ये राज्याच्या लसीकरण विभागाकडे स्वाइन फ्लू लसींच्या ५ हजार डोसची मागणी केली आहे. मात्र, अद्याप एकही डोस मिळालेला नाही. शहरात दरवर्षी ५० ते ६० हजार गर्भवतींपैकी ५ ते १० टक्के गर्भवतींना लसीकरण करण्यात येते. ही प्रतिबंधात्मक लस इतर आजार, न्यूमोनिया यांचाही फैलाव कमी करण्यास आणि गंभीर आजार टाळण्यास प्रभावी मानली जाते. सध्या या लसीचा तुटवडा आहे.
– डॉ. राजेश दिघे, प्रमुख, लसीकरण विभाग, पुणे महापालिका
...............
महाराष्ट्रातील २०१९ पासून स्वाइन फ्लू रुग्ण व मृत्यूची आकडेवारी (स्त्रोत ः राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र)
वर्ष – रुग्णसंख्या – मृत्यू
२०१९ – २२८७ – २४६
२०२० – १२१ – ३
२०२१ – ३८७ – २
२०२२ – ३७१४ – २१५
२०२३ – १२३१ – ३२
२०२४ – २०७२ – ७१
२०२५ – ३९२ – ३ (सप्टेंबर पर्यंत)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.