पुणे

साहित्य संमेलनाचे मृदुला गर्ग यांच्या हस्ते उद्‍घाटन रघुवीर चौधरी यांच्या उपस्थितीत समारोप; संमेलनाची कार्यक्रम पत्रिका जाहीर

CD

पुणे, ता. ६ ः सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन ज्येष्ठ हिंदी साहित्यिक डॉ. मृदुला गर्ग यांच्या हस्ते होणार असून, समारोप सोहळ्यास ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ लेखक रघुवीर चौधरी यांची प्रमुख उपस्थिती असेल. यासह उद्‍घाटनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि समारोपाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. याप्रसंगी महामंडळाच्या प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार आणि कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी उपस्थित होते. १ ते ४ जानेवारी या कालावधीत साहित्यिक विश्वास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होणार आहे.
संमेलनातील कार्यक्रमांना १ जानेवारीला प्रारंभ होणार असून, यावेळी दुपारी तीनपासून ध्वजारोहण, ग्रंथदिंडी, ग्रंथ प्रदर्शन, कवीकट्टा आणि गझलकट्टा यांचे उद्‍घाटन होणार आहे. मावळत्या संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांच्या हस्ते सातारा जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिकांचा सन्मान होणार असून, त्यानंतर डॉ. भावार्थ देखणे आणि त्यांचे सहकारी ‘बहुरूपी भारुड’ हा कार्यक्रम सादर करतील.
२ जानेवारीला सकाळी १०.३० वाजता मृदुला गर्ग यांच्या हस्ते संमेलनाचे उद्‌घाटन होणार आहे. याप्रसंगी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील, मावळत्या संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, ज्येष्ठ उद्योजक फरोख कुपर, सार्वजनिक बांधकाम मंत्री व स्वागताध्यक्ष शिवेंद्रराजे भोसले, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आदी उपस्थित असतील.
उद्‍घाटनानंतर मुख्य मंडपात दुपारी निमंत्रितांचे पहिले कविसंमेलन आणि सायंकाळी ‘शिकायला गेलो एक’ नाटकाचा प्रयोग सादर होईल. मंडप क्रमांक २ येथे ‘जागतिक प्रकाशन व्यवहारात मराठी प्रकाशन व्यवहार कुठे आहे’ आणि ‘मराठी कोशवाङ्मय आणि विस्ताराच्या दिशा’ या विषयावरील परिसंवाद होतील.
३ जानेवारीला मुख्य मंडपात कथाकथन, ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील यांची मुलाखत, लेखक-प्रकाशक सन्मान, समकालीन पुस्तकांवर चर्चा, ‘आजच्या मराठी समाजाची विचारभ्रष्टता आणि वैचारिक साहित्याची निर्मिती’ या विषयावर परिसंवाद आणि सायंकाळी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. मंडप क्रमांक २ येथे ‘आजच्या मराठी साहित्यात भयकथा, रहस्यकथा आणि गूढकथा यांचा इतका दुष्काळ का आहे?’ या विषयावर चर्चा, ‘स्त्री चळवळीची पन्नास वर्षे : मागे वळून पाहताना’ या विषयावर परिसंवाद, ‘अभिजात दर्जानंतरची मराठी : संधी आणि आव्हाने’ विषयावर चर्चा होणार आहे.
४ जानेवारीला मुख्य मंडपात शाहू पाटोळे लिखित ‘अन्न हे अपूर्णब्रह्म’ या पुस्तकावर चर्चा, लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांची मुलाखत होणार आहे. मंडप क्रमांक २ येथे ‘बदलत्या ग्रामीण वास्तवाचे चित्रण आजच्या मराठी साहित्यात दिसत का नाही?’ विषयावर परिसंवाद आणि ‘संवाद लक्षवेधी कादंबरीकारांशी’ हा संवादात्मक कार्यक्रम होणार आहे. दुपारी ४.३० वाजता संमेलनाची सांगता होणार असून, याप्रसंगी ज्येष्ठ लेखक रघुवीर चौधरी यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मराठी भाषा मंत्री उदय सामंत, पालकमंत्री शंभुराज देसाई, रोजगार हमीमंत्री भरत गोगावले आदी उपस्थित असतील. समारोपानंतर ‘फोक आख्यान’ हा कार्यक्रम सादर होईल.
----
यंदा प्रथमच समकालीन पुस्तकांवर चर्चा
यंदाच्या साहित्य संमेलनात प्रथमच समकालीन पुस्तकांवरील दोन चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. यात अमोल पालेकर लिखित ‘ऐवज : एक स्मृतिबंध’ या पुस्तकावरील चर्चेत अमोल पालेकर, संध्या गोखले आणि वृंदा भार्गवे सहभागी होणार आहेत; तर शाहू पाटोळे लिखित ‘अन्न हे अपूर्णब्रह्म’ या पुस्तकावरील चर्चेत शाहू पाटोळे, भूषण कोरगावकर, राहुल कोसंबी, डॉ. मिलिंद कसबे हे सहभागी होणार आहेत. तसेच, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील आणि लोकसत्ताचे संपादक व लेखक गिरीश कुबेर यांची मुलाखत होणार आहे.
----

लक्ष्मण गायकवाड, बाबूराव मैंदर्गीकर यांचा सन्मान
साहित्य संमेलनात दरवर्षी ज्येष्ठ लेखक आणि प्रकाशकांचा सन्मान करण्यात येतो. यावर्षी ज्येष्ठ लेखक ‘उचल्या’कार लक्ष्मण गायकवाड आणि सोलापूरच्या सुविद्या प्रकाशनाचे संचालक बाबूराव मैंदर्गीकर यांचा सन्मान केला जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ३ जानेवारीला दुपारी ३ वाजता मुख्य मंडपात हा कार्यक्रम होईल.
----
संमेलनाची वैशिष्ट्ये ः
- यंदा ग्रंथदिंडी संमेलनाच्या पूर्वसंध्येलाच; आकर्षक चित्ररथाचा समावेश
- पुस्तक दालनातूनच संमेलनस्थळी जाणारा मार्ग
- संमेलनाच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिकांचा विशेष सन्मान
- संमेलनाचे पूर्वाध्यक्ष व महामंडळाच्या माजी अध्यक्षांना निमंत्रणे
- सरस्वती सन्मानप्राप्त साहित्यिकांनाही निमंत्रण
- साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त बालसाहित्यकारांशी विद्यार्थ्यांचा संवाद
- कवी आणि गझलकारांसाठी कविकट्टा आणि गझलकट्ट्याचे आयोजन
- ‘अटकेपार’ या स्मरणिकेतून उलगडणार सातारा जिल्ह्यातील वैविध्य
74274, 74275, 74277

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nirav Modi Extradition : नीरव मोदीला भारतात आणण्याच्या हालचालींना वेग; CBI अन् EDचे संयुक्त पथक लंडनला जाणार!

Baramati Election : बारामतीच्या न्यायालयाच्या निर्णयाविरोधात; निवडणूक आयोगाची उच्च न्यायालयात धाव!

IND vs SA, ODI: 'रोहित आणि मी अजूनही संघासाठी...', विराट मालिकावीर पुरस्कार जिंकल्यानंतर स्पष्टच बोलला; पाहा Video

Pune News : पुणे महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपच्या कोअर कमिटी बैठकीत पक्षप्रवेशावरून मतभेद होण्याची शक्यता!

Indigo Flight Chaos : विमानाच्या गोंधळामुळे आमदार रस्त्यावर; नागपूर अधिवेशनासाठी निघाले मोटारीने!

SCROLL FOR NEXT