पुणे, ता. ७ ः भक्तिमार्ग वाटतो तितका सोपा नाही. त्यासाठी निष्काम कर्मयोगाची आवश्यकता असते. नैसर्गिक पद्धतीने भक्तियोगाचे आचरण केल्यास कर्मयोगाची प्राप्ती होते’’, असे मत आध्यात्मिक योग गुरू श्री एम यांनी रविवारी येथे व्यक्त केले.
‘सकाळ’ प्रस्तुत ‘सुहाना स्वास्थ्यम्’ उपक्रमांतर्गत ‘योग, उपनिषद आणि बियाँड’ या विषयावर ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी श्री एम यांच्याशी संवाद साधला.
प्रश्न ः भक्तियोगातून ज्ञानयोगाकडे आणि कर्मयोगातून कर्मयोगी कसे होता येईल?
उत्तर ः भगवद्गीतेत अठरा अध्यायातून जीवनातील विविध समस्यांची उत्तरे दिली आहेत, मात्र प्रत्येक जण एकाच मार्गाने जाऊ शकत नाही. भगवंतांनी भक्तियोग, निष्कामयोग आणि कर्मयोग सांगितला आहे. कोणत्याही फळाची अपेक्षा न करता कार्य करत राहणे, हा खरा कर्मयोग आहे. उत्तम कार्य आपल्याला चांगले कर्म करायला प्रवृत्त करते. भक्तियोग वाटतो तितका सोपा नाही. तो अवघड आहे. नैसर्गिक पद्धतीने नामस्मरण, जप, कीर्तन, चांगले संगीत यातून तो आपल्यामध्ये बाणवता येतो. बाराव्या अध्यायात भक्तियोग सांगितला आहे. व्यक्तीचे तीन गुण सांगितले आहेत. सर्व प्राणिमात्रांवर भूतदया करणे, स्वतःच्या इंद्रियांवर ताबा मिळविणे आणि कोणत्याही परिस्थितीत समबुद्धीने कार्यरत राहणे. ज्या भक्तामध्ये या तीन गुणांचा समुच्चय होतो, तो कर्मयोगीकडे जाऊ शकतो.
-------------------------------
प्रश्न ः सामान्य व्यक्तींनी साधनेची सुरुवात कशी करावी?
उत्तर ः कोणत्याही परिस्थितीत स्थिर राहणे आवश्यक आहे. स्वतःची पाटी कोरी ठेवून साधनेच्या मार्गावर चालण्याची तयारी ठेवावी. साधनेची सुरुवात करण्याची सर्वप्रथम अवस्था म्हणजे श्रवण करणे. योग्य पद्धतीने श्रवण केल्याशिवाय आपल्याला परिस्थितीची जाणीव होत नाही. त्यानंतर महत्त्वाचे आहे, मनन करणे. मनन करणे म्हणजे ऐकलेल्या गोष्टींची घोकंपट्टी नव्हे. आपण काय ऐकले, त्यामध्ये काय सांगितले आहे, हे लक्षात घेतले पाहिजे, आणि त्यानंतरचा विषय म्हणजे ध्यास. श्रवण-मनन आणि ध्यास या त्रिसूत्रीच्या आधारावरच साधनेची सुरुवात करू शकतो. त्यासाठी पुरेसा वेळ द्यावा लागतो. छोटी उद्दिष्टे निश्चित करून शांतपणे पावले टाकण्याची आवश्यकता असते. यामध्ये कोणत्याही स्वरूपाची घाई करू नये. या प्रवासात उपनिषदांचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. हे सर्व करत असताना स्वयंमूल्यांकन वारंवार करण्याची गरज आहे.
प्रश्न ः आध्यात्मिक प्रवासात आपल्या भवतालची परिस्थिती कशी बदलता येते?
उत्तर ः जीवनात सर्वांनाच प्रश्न असतात. केवळ आपल्यालाच समस्या आहेत, असे नाही. त्यामुळे आपल्या आध्यात्मिक प्रवासाकडे कोण लक्ष देते, कोण देत नाही, हे खरेतर आपण पाहूच नये. तरच आध्यात्मिक प्रवासाचा विषय व्यवस्थित हाताळता येतो. यामध्ये आपल्या भावना समजून घेणे महत्त्वाचे आहे. यामध्ये लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे वाईट गोष्टींचा त्याग करावा लागतो.
प्रश्न ः प्रखर साधना कशी करावी?
उत्तर ः साधनेत महत्त्वाची असते ती ऊर्जा. तपाच्या माध्यमातूनच ऊर्जेची निर्मिती होत असते. तपस्येतून स्वाध्याय चांगला होतो. स्वाध्याय चांगला झाली की आपल्यातील ऊर्जेची जाणीव होते. स्वयंअध्ययनाच्या माध्यमातूनच साधना सिद्धीकडे जाता येते.
ज्योतिषावर विश्वास नाही....
माझा ज्योतिषावर विश्वास नाही. मी लहान असताना एका ज्योतिषाला हात दाखविला होता. त्यावेळी त्या ज्योतिषाने माझी तीन लग्ने होतील, सहा मुले होतील, आर्थिक परिस्थिती कमालीची असेल, असे भविष्य सांगितले. प्रत्यक्षात मी तुमच्यासमोर आहे. ज्योतिष हे शास्त्र आहे. आपण अनेकदा कुंडली, चंद्र व बाकी ग्रहांचे कुंडलीतील स्थान यावर चर्चा करत असतो.
श्री एम म्हणाले...
१. साधनेची सुरुवात करण्याची सर्वप्रथम अवस्था म्हणजे श्रवण
२. श्रवण-मनन आणि ध्यास या त्रिसूत्रीच्या आधारावरच साधनेची सुरुवात
३. साधनेत लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे वाईट गोष्टींचा त्याग करावा लागतो
४. स्वयंअध्ययनाच्या माध्यमातूनच साधना सिद्धीकडे जाता येते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.