पुणे, ता. ७ : ‘‘बाजार समितीच्या वतीने भरविण्यात येणाऱ्या प्रदर्शनात शेतीशी निगडित नवीन तंत्रज्ञान, उद्योग तसेच नावीन्यपूर्ण उपक्रम याचे स्टॉल यावेत. त्यादृष्टीने कृषी विभागाने पंचायत समितीला सहकार्य करावे. नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचल्यास त्यांना लाभ होऊन जीवनात परिवर्तन होऊ शकते,’’ असे प्रतिपादन क्रीडा व युवक कल्याणमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी केले.
इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने २२ ते २६ जानेवारी दरम्यान आयोजित राज्यस्तरीय कृषी- पशू प्रदर्शन, घोडे बाजार व श्वान प्रदर्शनाच्या अनुषंगाने आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार ज्ञानेश्वर कटके, विभागीय कृषी सहसंचालक दत्तात्रेय गवसाने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक सूरज मडके, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे, इंदापूर तालुका कृषी अधिकारी योगेश फडतरे, पंचायत समितीचे कृषी अधिकारी अमर फडतरे, इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुषार जाधव आदी उपस्थित होते.
भरणे म्हणाले, ‘‘प्रदर्शनात शासकीय अनुदान असलेल्या नवीन तंत्रज्ञानाची माहिती पोचविण्यासाठी प्रयत्न करावेत. रोपवाटिकांमध्ये येणाऱ्या नवीन वाणांचाही समावेश स्टॉलमध्ये करण्यात यावा. नवीन तंत्रज्ञान विकसित केलेल्या कंपन्यांना आमंत्रित करावे. पशुपालनातील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती होण्याच्यादृष्टीने पशुसंवर्धन विभागालाही सहभागी करून घ्यावे.’’ गवसाने आणि काचोळे यांनीही या प्रदर्शनाच्यादृष्टीने कृषी संबंधित नवीन तंत्रज्ञान असलेल्या संस्था, उद्योग, कंपन्यांशी संपर्क साधून त्यांचे स्टॉल लागतील यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे सांगितले.
कर्जवाटपाची शेतकऱ्यांना मिळणार माहिती
जिल्हा बँकेच्या वतीने नवीन तंत्रज्ञानासाठी असलेल्या कर्जवाटपाच्या योजनांच्या माहितीचा तसेच डिजिटल बँकिंग, मोबाईल बँकिंग सुविधा आदींबाबत स्टॉल लावण्याच्या सूचना अप्पासाहेब जगदाळे यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच जगदाळे यांनी प्रदर्शनाच्या अनुषंगाने माहिती दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.