पुणे, ता. १७ : ‘‘मराठ्यांचा इतिहास हा जागतिक दर्जावर पोहोचायला हवा आहे. त्यासाठी तो इंग्रजीत करावा लागणार आहे. इतिहास आपली आत्मप्रतिमा घडवतो. देशातील भाषा, इतिहास, संस्कृतीला कमी लेखण्याचे काम पद्धतशीरपणे तेव्हाही चालू होते, आजही सुरू आहे.’’ असे मत माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केले.
पुणे पुस्तक महोत्सवातील ‘पुणे लिट फेस्ट’मध्ये ‘इतिहासाचार्य राजवाडे ते गजाननराव मेहेंदळे’ विषयावर धर्माधिकारी यांनी संवाद साधला. दोघांच्याही इतिहास लेखनाची परंपरा धर्माधिकारी यांनी यावेळी सांगितली. ते म्हणाले,‘‘आयुष्य इतिहास या विषयाला वाहायचे ठरवलेल्या राजवाडे यांचे वैयक्तिक आयुष्य विदारक होते. चणे, फुटाणे खाऊन राहायचे, पण गावोगावी कागदपत्रे शोधायचे. करारी व्रतस्थपणा राजवाडे यांच्यात होतात. इतिहास शास्त्रशुद्ध असल्याचे शिकवले गेले नाही, ब्रिटिशांनी इतिहास हा विषय वस्तुनिष्ठपणे मांडण्याची पद्धत आणल्याचे सांगितले जाते. मात्र, ‘हे असे घडले’ ही इतिहासाची सर्वोत्तम व्याख्या आहे. ब्रिटिश अधिकारी ग्रँड डफने ‘हिस्ट्री ऑफ मराठाज’ हा ग्रंथ १८२६ मध्ये प्रकाशित केला. इंग्रजांनी भारत मराठ्यांकडून जिंकला, हे समजून घेतले पाहिजे. मराठ्यांचा प्रभाव अखिल भारतीय होता. ग्रँड डफच्या लेखनाला तोडीस तोड उत्तर राजवाडे यांनी दिले. एकट्या राजवाडे यांनी मराठ्यांच्या इतिहासाचे २२ खंड लिहिले. देशातील भाषा, इतिहास, संस्कृतीला कमी लेखण्याचे काम पद्धतशीरपणे तेव्हाही चालू होते, आजही सुरू आहे.’’
‘‘छत्रपती शिवाजी महाराज समजावून घेण्यासाठी गजाननराव मेहेंदळे यांनी लिहिलेले दोन खंड वाचावेत. इतिहास साधनांची अंतर्गत चिकित्सा आणि बाह्य चिकित्सेत मेहेंदळे तज्ज्ञ होते. स्वातंत्र्यानंतर सरकारपुरस्कृत मार्क्सवादी इतिहासकारांनी इतिहासाची मोडतोड केली. मराठ्यांचा इतिहास हा जागतिक दर्जावर पोहोचायला हवा आहे. त्यासाठी तो इंग्रजीत करावा लागणार आहे. इतिहास आपली आत्मप्रतिमा घडवतो.’’ असेही धर्माधिकारी यांनी अधोरेखित केले.