पुणे, ता. २४ : पुणे शहराची पिण्याच्या पाण्याची वाढती गरज लक्षात घेता जलसंपदा विभागाने मुळशी धरणातून सात टीएमसी पाणी वापरास मान्यता दिली आहे. याचा प्रस्ताव कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून राज्य सरकारकडे पाठविला जाणार आहे. राज्य सरकारने मान्यता दिल्यानंतर पुणे शहराचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे.
पुणे शहरात नव्याने समाविष्ट झालेली गावे आणि तसेच वाढती लोकसंख्या विचारात घेता खडकवासला धरण साखळी प्रकल्पातून केला जाणारा पाणीपुरवठा अपुरा पडत आहे. शहराची वाढती गरज लक्षात घेता २० टीएमसी पाणी पुणे शहराला मिळावे, अशी महापालिकेची मागणी आहे. सध्या पुणे महापालिकेला सुमारे १४ टीएमसी पाणीपुरवठा होतो. त्यामुळे मुळशी धरणातून वाया जाणारे पाणी मिळावे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे, तर उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार हेदेखील यासाठी अनेक वर्षांपासून त्यासाठी पाठपुरावा करीत आहेत. अखेर या प्रयत्नांना यश आले असून, मुळशी धरणातून वाया जाणाऱ्या सुमारे सात टीएमसी पाण्याचा वापर करण्यास जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता हनुमंत धुमाळ यांनी मान्यता दिली आहे. याचा सविस्तर प्रस्ताव कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांकडे पाठविण्यात आला आहे. कार्यकारी संचालकांनी हा प्रस्ताव मान्य करून राज्य सरकारकडे पाठवावा, अशी विनंतीदेखील यात करण्यात आली आहे. राज्य सरकारची मान्यता मिळाल्यानंतर प्रकल्पाचा प्राथमिक अन्वेषण अहवाल मान्य करून त्यानंतर त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल जलसंपदा विभागाकडून तयार करण्यात येणार आहे.
अशी आहे स्थिती
- मुळशी धरणावरून टाटा हायड्रो पावर कंपनीमार्फत भीरा जलविद्युत प्रकल्पासाठी पाणी वापरले जाते
- या धरणातील पाण्यापासून तीनशे मेगावॉट वीजनिर्मिती करण्यासाठी सहा संच वापरण्यात येत आहेत
- मुळशी प्रकल्पाच्या भीरा जलविद्युत केंद्रातील २४ टीएमसी वार्षिक पाणीवापरापैकी जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांत उपलब्ध होणाऱ्या १७ टीएमसी पाण्याद्वारे वीजनिर्मिती करता येते
- १.६५ टीएमसी बोगदा प्रकल्पासाठी व उर्वरित ९.८५ टीएमसीपैकी बाष्पीभवन वजा जाता शिल्लक सात टीएमसी पाणी पूर्वेकडे वळवता येणे शक्य असल्याचे अहवालात म्हटले आहे
महत्त्वाचे
१) शिल्लक सात टीएमसी पाण्याच्या वापरासाठी जलसंपदा विभागाकडून दोन पर्याय
२) पुणे महापालिका, पीएमआरडीए तसेच पिंपरी चिंचवड महापालिकेने राज्य सरकारकडून या पाणीवापराची मान्यता घेऊन सध्याच्या पाइपलाइनच्या जागेवर स्वखर्चाने मुळशी प्रकल्पातून पाणीपुरवठ्यासाठी पाइपलाइन तयार करणे व त्याचा वापर करणे
३) मुळशी ते खडकवासला धरणापर्यंत ३० किलोमीटर लांबीचा बोगदा तयार करून हे पाणी खडकवासला जलाशयात आणणे व त्याचा वापर करणे
४) या दोन्ही पर्यायांवर राज्य सरकार काय निर्णय घेणार, यावर पुणे शहराला जादा पाणी कोटा उपलब्ध होणार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.