पुणे, ता. ६ : ‘‘विद्यार्थ्यांनी त्यांच्या कौटुंबिक किंवा आर्थिक अडचणींमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी आळंदी मठातील २५० विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय खडकी शिक्षण संस्थेने केली आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी संस्थेने घेतलेला हा पुढाकार कौतुकास्पद आहे,’’ असे मत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
संस्थेच्या विद्यार्थ्यांसाठी पाटील यांनी दोन बस उपलब्ध करून दिल्या. त्यांच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त ते बोलत होते. याप्रसंगी पाटील यांच्या हस्ते संस्थेच्या संगणक प्रयोगशाळेचे उद्घाटन आणि विद्यार्थ्यांना शालेय बॅग वाटप करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे संचालक राजेश पांडे, संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, संचालक काशिनाथ देवधर, सचिव आनंद छाजेड, प्राचार्य डॉ. संजय चाकणे आदी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, ‘‘खडकी शिक्षण संस्थेने शिक्षणाचा नवीन पायंडा रचला आहे. शिक्षणाचे महत्त्व जाणून, जी संस्था अशा प्रकारे पुढाकार घेऊन कोणालाही शिक्षणापासून वंचित न ठेवण्याची जबाबदारी घेईल, त्या संस्थेला राज्य सरकार कुठल्याही प्रकारची मदत करण्यास तत्पर आहे.’’
गोयल म्हणाले, ‘‘ज्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यास अडचणी येतात, त्या विद्यार्थ्यांची संपूर्ण व्यवस्था संस्थेने आजपर्यंत केलेली आहे. शिक्षणाचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात संस्था कधीही कमी पडणार नाही.’’ प्रास्ताविक आनंद छाजेड यांनी केले, सूत्रसंचालन मंगेश दळवी यांनी केले आणि डॉ. संजय चाकणे यांनी आभार मानले.