पुणे, ता. २१ : खराडी येथे खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी ५१ वर्षीय महिलेच्या पोटातून फुटबॉलच्या आकाराचा गोळा (ट्यूमर) काढला. या महिलेच्या गर्भाशयात ३ किलो वजनाचा २० सेंटिमीटर आकाराच्या व्यासाचा गोळा आढळून आला होता. वैद्यकीय क्षेत्रात ही दुर्मीळ स्वरूपाची बाब समजली जाते.
दोन महिन्यांपूर्वी या महिलेला पोट फुगल्यासारखे वाटत होते. त्यांना वेदना किंवा त्रास होत नसल्याने तिने दुर्लक्ष केले. उशिरा तपासणी केल्यावर डॉक्टरांना ही गाठ जाणवली आणि त्यांनी तिला सोनोग्राफी करायला सांगितले. सोनेग्राफीनंतर तिच्या गर्भाशयात हा गोळा असल्याचे निदान झाले. यानंतर उपचारासाठी तिला खराडीतील मदरहूड हॉस्पिटलमध्ये पाठवले. या गोळ्याच्या (ट्यूमर) मोठ्या आकारामुळे त्याचा मूत्राशय, आतडे आणि मूत्रपिंडांना मूत्राशयाशी जोडणाऱ्या नळ्या या जवळच्या अवयवांवर दाब येत होता. म्हणून डॉक्टरांनी गाठ व गर्भाशय दोन्ही काढून टाकले.
डॉक्टरांनी तिचा वैद्यकीय इतिहास घेतला असता तिला तीन वर्षांपूर्वी रजोनिवृत्तीदरम्यान मासिक पाळीत जास्त रक्तस्त्राव (मेनोरेजिया) झाल्याचे समजले. त्यावेळी केलेल्या सोनोग्राफीत तिच्या पोटात ४.२ सेंमी आकाराची लहान फायब्रॉइडची गाठ दिसून आली होती. तीच गाठ पुढे तीन किलोंची झाली हे विशेष. याबरोबरच गर्भाशयाचे क्युरेटिंग (गर्भाशय स्वच्छ करणे) आणि रक्तस्राव थांबवण्यासाठी हार्मोनल इंट्रायूटरिन डिव्हाइस (आययुडी) बसवणे अशा दोन प्रक्रियाही केल्या. या रुग्णाच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे.
या आकाराची गाठ आढळणे ही दुर्मीळ बाब आहे. ही छोटी गाठ इतकी मोठी होण्याची शक्यता कमी असते. मात्र, या महिलेच्या बाबत नियमित तपासणीच्या अभावामुळे या गाठीचा आकार वाढला व त्याचे वजन तीन किलो झाले. यावरून नियमितही आरोग्य तपासणी किती महत्त्वाची आहे हे दिसते. कोणतीही लक्षणे किंवा दुखत नसले तरी वेळोवेळी तपासणी करायला हवी.
- डॉ. माधुरी लाहा, वरिष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ, मदरहुड हॉस्पिटल, खराडी