पुणे, ता. २५ ः सर्वसामान्य नागरिकांच्या जिवाशी खेळ खेळणाऱ्या बेकायदा होर्डिंगचा सुळसुळाट होऊनही केवळ २० होर्डिंगच अनधिकृत असल्याचा दावा मे महिन्यात महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला होता. मात्र बेकायदा होर्डिंगबाबत महापालिका प्रशासन लपवाछपवी करत असल्याचे ‘सकाळ’ने उघडकीस आणले होते. महापालिका आयुक्तांनी या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन महापालिकेने बेकायदा होर्डिंग शोधण्यासाठी मोहीम आखली. या मोहिमेत आत्तापर्यंत ८८ बेकायदा होर्डिंग आढळले असून त्यापैकी २८ होर्डिंग महापालिकेने जमीनदोस्त करत अनधिकृत होर्डिंग व्यावसायिकांना कडक संदेश देण्यास सुरुवात केली आहे.
धानोरी येथे २० मे रोजी होर्डिंग कोसळल्याची घटना घडली होती. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नव्हते. संबंधित घटना व यापूर्वी पुणे व पिंपरी चिंचवड शहरामध्ये होर्डिंग कोसळण्याच्या घटनांमुळे होणारी मनुष्यहानी टाळण्याच्यादृष्टीने महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाकडून अनधिकृत होर्डिंगविरुद्ध ठोस कारवाई होण्याची अपेक्षा होती. शहरात केवळ २० अनधिकृत होर्डिंग असल्याचा अजब दावा करून आकाशचिन्ह व परवाना विभागाने कारवाई करण्यास टाळाटाळ केली. जून महिन्यात जोरदार वारे व मुसळधार पावसामुळे होर्डिंग कोसळण्याच्या घटना घडण्याची दाट शक्यता असतानाही संबंधित विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले. अनधिकृत होर्डिंग कोसळण्याच्या घटना नागरिकांच्या थेट जिवावर बेतणाऱ्या असल्याने ‘सकाळ’ने त्यावर प्रकाश टाकला. त्यावर महापालिकेकडून कागदोपत्री आकड्यांचे खेळ करून अनधिकृत होर्डिंग व्यवसायाला अभय देण्याचा प्रकार सुरू होता. महापालिकेच्या अभियंत्यांनी बेकायदा होर्डिंगची पाहणी करण्याऐवजी होर्डिंग व्यावसायिकांच्या माहितीच्या आधारे महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रकार विभागाकडून सुरू होता.
दरम्यान, या सर्व प्रकाराची महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी गांभीर्याने दखल घेत संबंधित विभागातील अधिकाऱ्यांची उचलबांगडी केली. त्याचबरोबर बेकायदा होर्डिंगवर कडक कारवाई करण्याच्या सूचना आकाशचिन्ह विभागास दिल्या. त्यानंतर आकाशचिन्ह विभागाने खास मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेतून आत्तापर्यंत ८८ बेकायदा होर्डिंग असल्याचे निदर्शनास आले आहे. मागील काही दिवसांत महापालिकेने संबंधित विविध ठिकाणच्या २४ होर्डिंगवर कारवाई केली. तर गुरुवारी आणखी चार होर्डिंग महापालिकेने जमीनदोस्त केल्या. तेवढ्यावरच न थांबता दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. शोधमोहीम व त्यावरील कारवाई यापुढेही महापालिका प्रशासनाकडून सुरूच राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
अनधिकृत होर्डिंग आढळलेली ठिकाणे
हडपसर - ३७
नगर रस्ता - ३५
येरवडा - ५
वानवडी - ११
येरवडा -५
कारवाई केलेली ठिकाण
नगर रस्ता - १५
हडपसर - ९
वानवडी - ३
येरवडा - १
व्यावसायिकांकडून वसूल दंड - १४ लाख रुपये
अनधिकृत होर्डिंग पावसाळ्यात पडण्याच्या घटना घडत असल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होतो. त्यामुळे महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार, अनधिकृत होर्डिंगची शोधमोहीम घेण्यात आली. त्यानुसार, आत्तापर्यंत २८ अनधिकृत होर्डिंग पाडण्यात आल्या आहेत. शोधमोहीम सुरूच राहणार आहे, तसेच बेकायदा होर्डिंगविरुद्धची कारवाईही सुरूच राहणार आहे.
- संतोष वारुळे, उपायुक्त, आकाशचिन्ह व परवाना विभाग, महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.