पुणे, ता. २७ ः पीएमपीचे बस थांबे दिल्लीच्या धर्तीवर तयार केले जाणार आहेत. या थांब्यावर केवळ जाहिरातीच नाही तर प्रवाशांच्या दृष्टीने आवश्यक असलेली माहिती देखील उपलब्ध केली जाणार आहे. पावसाळ्यात व उन्हाळ्यात हे थांबे प्रवाशांना उपयोगी ठरतील. लवकरच पीएमपीचे पथक दिल्लीच्या बस थांब्यांची माहिती घेण्यासाठी दिल्लीला जाणार आहेत, या संदर्भात पीएमपीचे अध्यक्ष व पुणे महापालिकेचे आयुक्त यांच्यात चर्चादेखील झाली आहे.
पीएमपीची प्रवासी वाहतूक व्यवस्था अधिक प्रवासी केंद्रित करण्याच्या दिशेने पीएमपी प्रशासन विविध स्तरावर प्रयत्न करीत आहे. दिल्ली शहराच्या धर्तीवर पुण्यातही आधुनिक, स्मार्ट आणि माहितीपूर्ण बसथांबे उभारण्यासाठी पीएमपीचा आग्रह आहे. स्मार्ट बस थांब्यामुळे पुणेकरांचा प्रवास अधिक सुटसुटीत होण्यास मदत मिळणार आहे.
--------------------
‘दिल्ली पॅटर्न’चा अभ्यास
या महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत, पहिल्या टप्प्यात शहरात तब्बल १७०० नवीन बस थांबा बांधण्याचा विचार आहे. बीओटी तत्त्वांवर हे बसथांबे बांधले जातील. या कामासाठी पीएमपीचे एक पथक दिल्लीला जाणार आहे. हे पथक दिल्लीतील बस थांब्याची पाहणी व अभ्यास करणार आहे.
-------
कसे आहेत थांबे...
दिल्लीतील बस थांब्यामध्ये डिजिटल डिस्प्ले, सीसीटीव्ही कॅमेरे, प्रवाशांना बसची माहिती देणारे पॅनेल्स, सामाजिक संदेश आणि जनजागृतीसाठी विशेष जागा, तसेच महिलांच्या सुरक्षिततेसाठी विशेष रचना यांसारख्या आधुनिक सुविधा आहेत. याच सुविधा पुण्यातील बस थांब्यांवरही उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.
----------
‘‘पुण्यात काही ठिकाणच्या बसथांब्याची स्थिती ठीक नाही. त्यामुळे आता पारंपरिक बस थांबे न बांधता आधुनिक बस थांबे बांधले जातील. दिल्लीत ज्या प्रमाणे थांबे आहेत, त्या धर्तीवर पीएमपीमध्ये बसथांबा बांधण्याचा मानस आहे. त्यावर काम सुरु आहे.
पंकज देवरे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल, पुणे.