पुणे, ता. १५ : धायरी परिसरात मंगळवारी दुपारी एका सराफाच्या दुकानात चोरट्यांनी दरोडा टाकल्याची घटना घडली. चोरट्यांनी खेळण्यातल्या पिस्तुलाचा धाक दाखवत २५ ते ३० तोळे सोन्याचे दागिने लुटून ते दुचाकीवरून पसार झाले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
धायरीतील रायकर मळा येथील काळुबाई चौकातील ‘श्री ज्वेलर्स’ दुकानात मंगळवारी दुपारी २.५० वाजता ही घटना घडली. त्यावेळी दुकानात मालक विष्णू दहिवाल आणि त्यांचा एक कामगार होता. चोरट्यांनी वीजपुरवठा खंडित असल्याचा फायदा घेतला. प्रथम दुकानात आलेल्या चोरट्याने सोन्याची चैन दाखवण्याची मागणी केली. त्याचवेळी आणखी दोघेजण दुकानात आले. दहिवाल यांनी चोरट्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून मारहाण केली. त्यानंतर दुकानातील २५ ते ३० तोळे दागिने घेऊन पळ काढला. चोरटे पळून जाताना त्यांच्या हातातील बनावट पिस्तूल तुटून दुकानातच पडले. चोरट्यांपैकी दोघांचे वय सुमारे २५ वर्षे आणि अन्य एकाचे वय ३५ वर्षे इतके होते. त्यांनी टी-शर्ट, जिन्स परिधान केली होती.
या घटनेची माहिती मिळताच नांदेड सिटी पोलिस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी परिसरात नाकाबंदी करून तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.