पुणे, ता. १० ः राज्य उत्पादन शुल्काच्या पुणे विभागाच्या महसुलात ९.८५ टक्के वाढ झाली आहे. २०२४-२५ आर्थिक वर्षामध्ये २ हजार ९९८ कोटी ३३ लाख एवढा महसूल सरकारी तिजोरीत जमा झाला आहे; तर वर्षभरामध्ये चार किरकोळ मद्यविक्री परवाने रद्द करण्यात आले आहेत.
२०२३-२४ मध्ये २ हजार ७२९ कोटी ४४ लाख असलेला महसूल सुमारे तीन हजार कोटी झाला आहे. बनावट मद्यनिर्मिती आणि बेकायदा मद्य वाहतूक व विक्री रोखण्याचे आव्हान उत्पादन शुल्क विभागापुढे असते. या विभागाकडून मद्यार्कयुक्त पदार्थांवर उत्पादन शुल्क आकारले जाते. तसेच दारूनिर्मितीसह इतर राज्यातून छुप्या पद्धतीने जिल्ह्यात येणारी दारू जप्त केली. गावठी दारू अड्ड्यांवर कारवाई करून आरोपींना अटक केली आहे. या सर्व कारणांमुळे उत्पादन महसुलात वाढ झाली आहे.
एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ दरम्यान अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांविरुद्ध पाच हजार ९९५ गुन्हे दाखल केले असून, पाच हजार ८९१ आरोपींना अटक केली आहे. तसेच ६२१ वाहने जप्त करून २५ कोटी ८० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत गुन्हे अन्वेषणाची कामगिरी ४० टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले आहे, तर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ५६९ परवाना धारकांविरुद्ध विभागीय गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामधील चार किरकोळ मद्यविक्री परवाना कायमचे बंद केले आहेत. विभागीय विसंगती प्रकरणामध्ये एक कोटी ८६ लाखांचा दंड परवानाधारकांकडून वसूल केला आहे. ही कामगिरी उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य आयुक्त डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, विभागीय उपायुक्त सागर धोमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे उत्पादन शुल्क विभागाने केली आहे.
महत्त्वाचे
- अवैध पद्धतीने मद्यविक्री करणाऱ्यांबरोबरच सेवन करणाऱ्या ग्राहकांच्या विरुद्ध ४५५ गुन्हे
- त्यातील एक हजार २५० आरोपींना अटक
- न्यायालयाकडून आरोपींना ८ लाख १९ हजारांचा आर्थिक दंड
- बेकायदा मद्यविक्री, निर्मिती आणि वाहतूक करणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी विभागाने २१ पथकांची निर्मिती केली आहे
सराईत गुन्हेगारांविरुद्ध ५७७ प्रस्ताव
प्रतिबंधात्मक कारवाईच्या अनुषंगाने उत्पादन शुल्क विभागाने सराईत गुन्हेगारांविरुद्ध दंडाधिकारी यांच्याकडे ५७७ प्रस्ताव सादर केले आहेत, तर चांगल्या वर्तणुकीबाबत गुन्हेगारांकडून २९९ बंधपत्रे घेण्यात आली आहेत. एमपीडीए कायद्यांतर्गत दाखल केलेल्या नऊ प्रस्तावांपैकी एका प्रकरणात स्थानबद्धतेची कारवाई झाली आहे.
गेल्यावर्षीच्या तुलनेत महसुलात ९.८५ टक्के वाढ नोंदविली आहे. तसेच गुन्हे अन्वेषण विभागाची कामगिरी ४० टक्क्यांनी वाढली असून, अवैध मद्यनिर्मिती, विक्री आणि वाहतूक करणाऱ्याविरुद्ध गुन्हे दाखल आरोपींना अटक केली आहे.
- चरणसिंह राजपूत, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, पुणे विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.