पुणे, ता. १० ः पुणे रेल्वे विभागातील दौंड ते मनमाड विभागामध्ये दहा रेल्वेस्थानक अशी आहेत की ज्याच्यावर एकाही रेल्वेला थांबा नाही. यात काष्टी, बेलवंडी, अकोळनेरसारख्या स्थानकांचा समावेश असून, येथे एखाद्या तरी रेल्वे गाडीला थांबा द्यावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. पूर्वी हा मार्ग एकेरी होता तेव्हा काही पॅसेंजर दर्जाच्या रेल्वे गाड्यांना थांबा होता. आता दुहेरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. असे असले तरीही या ठिकाणी गाड्यांना थांबा दिलेला नाही. त्यामुळे रेल्वे स्थानक नावालाच अशी स्थिती झाली आहे.
पुणे रेल्वे विभागात दौड ते मनमाड हा महत्त्वाचा विभाग आहे. २३७ किलोमीटरचा हा विभाग असून, पैकी १८० किलोमीटरच्या दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. येत्या काही महिन्यांत उर्वरित काम पूर्ण होणार आहे. हे काम पूर्ण होताच रेल्वे गाड्या वेळेवर धावतील. थांबा नसल्याने त्या दहा स्थानकांवर केवळ कर्मचाऱ्यांचा वावर असतो. प्रवाशांचा प्रतिसाद कमी मिळेल या भीतीने अनेकदा रेल्वे प्रशासन प्रवाशांची मागणी असूनसुद्धा त्या संबंधित स्थानकावर थांबा देत नाही. मात्र, प्रवाशांच्या सोयीसाठी प्रायोगिक तत्त्वावर एखाद्या रेल्वेला थांबा दिला तर संपूर्ण गावाची सोय होते. अनेकदा रेल्वे प्रशासन एखाद्या रेल्वेला सहा महिन्यांच्या प्रायोगिक तत्त्वावर एखाद्या स्थानकावर थांबा देते. त्या स्थानकावरून दिवसभरात १५० हून अधिक तिकिटाची विक्री झाली तर सहा महिन्यांनंतर तो प्रायोगिक थांबा कायमस्वरूपी होतो. तेव्हा दररोज १५० तिकिटे काढण्याची आवश्यकता नाही. तेव्हा प्रशासनाने येथे एखाद्या तरी रेल्वेला प्रायोगिक थांबा द्यावा, अशी मागणी प्रवासी करीत आहेत.
ही आहेत १० स्थानके
काष्टी, बेलवंडी, रांजणगाव रोड, सरोळा, अकोळनेर, निंबळक, विलंद, वाभोरी, पाढेगाव व चिलकी
एका स्थानकाला वीस कोटींचा खर्च
एखादे छोटे स्थानक बांधायचे असेल तर त्यासाठी सुमारे १५ ते २० कोटी रुपयांचा खर्च येतो. येथे असे १० स्थानके केवळ बांधण्यात आली. या स्थानकाच्या मेन लाइनवरून केवळ रेल्वे धावते. थांबा मात्र एकाही रेल्वेला नाही. त्यामुळे अशा रेल्वे गाडीचा प्रवाशांना काहीच फायदा नाही. कोरोनापूर्वी काही स्थानकावर पॅसेंजर दर्जाच्या गाड्यांना थांबा होता. आता तो देखील नाही.
रेल्वे गाड्यांना थांबा देण्याचा निर्णय रेल्वे बोर्ड घेतो. यात विभागाचा हस्तक्षेप नाही. एखाद्या स्थानकावर थांबा देण्याची प्रवाशांची मागणी असेल तर त्यांनी तसा प्रस्ताव द्यावा. त्यावर नक्कीच विचार केला जाईल.
- हेमंत कुमार बेहरा, जनसंपर्क अधिकारी, रेल्वे, पुणे
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची सोय लक्षात घेता काही स्थानकावर तरी प्रयोगिक तत्त्वावर रेल्वे गाड्यांना थांबा द्यायला हवा. छोट्या स्थानकावर डेमूसारख्या गाड्यांना थांबा दिल्यास त्या भागातील शेतकरी, कामगार, महिलांची सोय होईल. या सदंर्भात पत्रव्यवहार केला जाईल.
- आनंद सप्तर्षी, मध्य रेल्वे क्षेत्रीय सल्लागार समिती सदस्य
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.