मालकीचे असो वा भाड्याचे; प्रत्येक घराची माहिती द्यावी लागणार
आजपासून प्रगणकांद्वारे घरगणना : स्व-गणनेत ३६ हजार ३०० जणांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १५ : ‘जनगणना २०२७’मधील घरगणना/घरांची यादी करण्याच्या कामाला उद्यापासून (शनिवार, ता. १६) सुरुवात होत आहे. जनगणनेत नागरिकांचाही सहभाग असावा, यासाठी १ ते १५ या कालावधीत स्व-गणनेची मोहिम राबविण्यात आली होती. या मोहिमेत ३६ हजार ३०० जणांनी सहभाग घेतला आहे. आता प्रगणकांद्वारे उद्यापासून घरगणना/घराची यादी तयार करण्याचे काम सुरू होणार आहे. तुम्ही राहत असलेले घर तुमच्या मालकीचे असो की भाड्याचे, तुम्हाला घरगणनेत माहिती द्यावी लागणार आहे. स्व-गणनेत भरलेल्या माहितीची पडताळणीही उद्यापासूनच होणार आहे.
घरगणना/घर यादीचे काम १४ जूनपर्यंत चालणार आहे. त्यासाठी सर्व तालुके, नगरपरिषद व नगरपंचायती आणि सोलापूर महापालिकेतील आठ प्रभागांसाठी, असे एकूण ३६ अधिकाऱ्यांवर जनगणनेच्या मोहिमेत चार्ज अधिकाऱ्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सोलापूर शहरासाठी २ हजार ८०८ प्रगणक व पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण व नागरी भागासाठी ७ हजार ९२१ प्रगणक व पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. ज्यांनी स्व-गणनेत माहिती भरली आहे, त्यांनी प्रगणकांना युनिक एसई आयडी देणे आवश्यक आहे. या आयडीमुळे स्व-गणनेत भरलेली माहिती प्रगणकांना पाहता येणार आहे. या माहितीची खातरजमा करून कमी वेळेत प्रगणकांद्वारे घरगणना/घर यादीचे काम करणे शक्य होणार आहे.
चौकट...
प्रश्नावलीमध्ये असणार ३४ प्रश्न
ओळ क्रमांक, इमारत क्रमांक, घर क्रमांक, जनगणना घर क्रमांक, घर कसे आहे, भिंतीचे मुख्य साहित्य, छताचे मुख्य साहित्य, घराचा वापर, घराची स्थिती, कुटुंब क्रमांक, कुटुंबात राहणाऱ्या व्यक्तींची संख्या, कुटुंब प्रमुखाचे नाव, लिंग, जातीचा प्रवर्ग (अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/इतर), घराचा मालकी हक्क, कुटुंबाच्या ताब्यात असलेल्या खोल्यांची संख्या, कुटुंबातील विवाहित जोडपी, पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्त्रोत, पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोताची उपलब्धता, प्रकाशाचा मुख्य स्त्रोत, स्वच्छतागृहाची उपलब्धता, स्वच्छतागृहाचा प्रकार, सांडपाणी निचरा जोडणी, आंघोळीची सुविधा, स्वयंपाकघर आणि गॅस जोडणी, स्वयंपाकाचे मुख्य इंधन, रेडिओ/ट्रान्झिस्टर, टेलिव्हिजन, इंटरनेट सुविधा, लॅपटॉप/संगणक, टेलिफोन/मोबाईल, सायकल/दुचाकी, चारचाकी, कुटुंबात वापरले जाणारे मुख्य धान्य व कुटुंबातील एका व्यक्तीचा मोबाईल क्रमांक असे प्रश्न घरगणनेत/घर यादीत विचारले जाणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.