पुणे, ता. २४ : पुणे स्थानकावर गर्दीच्या वेळेत रेल्वे गाड्यांची कोंडी होत आहे. लांब पल्ल्याच्या गाड्या निर्धारित वेळेपेक्षा सहा ते सात तास उशिराने पुण्यात दाखल होत असल्याने स्थानकावरील रेल्वे वाहतुकीचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. याचा परिणाम पुण्याहून सुटणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या वेळेवरदेखील होत आहे. याचा थेट फटका प्रवाशांना बसत आहे.
पुणे स्थानक सायंकाळी पाच ते सात आणि रात्री १० ते १२ या वेळेत सर्वाधिक व्यस्त असते. नेमक्या याच वेळेत उशिरा येणाऱ्या गाड्या स्थानकात दाखल होतात. या सर्व गाड्यांचा शेवटचा थांबा (टर्मिनेट) पुणे असल्याने प्रवाशांना उतरवणे आणि इतर तांत्रिक कामांसाठी या गाड्या फलाटावर सुमारे ३० ते ४० मिनिटे थांबून राहतात. परिणामी, फलाट रिकामे नसल्याने मागून येणाऱ्या अनेक गाड्यांना फलाटाअभावी होम सिग्नलवर किंवा सेक्शनमध्येच थांबून राहावे लागते.
उशिराने येणाऱ्या गाड्या
- हावडा-पुणे आझाद हिंद एक्स्प्रेस
- जोधपूर-पुणे एक्स्प्रेस
- जम्मू तावी-पुणे झेलम एक्स्प्रेस
- हावडा-पुणे दुरांतो एक्स्प्रेस
- चेन्नई-पुणे एक्स्प्रेस
रेल्वेला उशीर झाल्यास स्थानकावर होणारा परिणाम
- पुण्यात टर्मिनेट होणाऱ्या रेल्वेला उशीर झाल्यास गाड्या बराच वेळ फलाटावर थांबून राहतात. त्यामुळे अन्य गाड्यांना फलाट उपलब्ध होत नाही.
- फलाट रिकामा नसल्यामुळे अनेक गाड्यांना स्थानकाबाहेर ‘होम सिग्नल’वर थांबवून ठेवावे लागते.
- फलाटावर प्रवाशांची गर्दी वाढते.
- गाडी उशिरा आल्याने तिची स्वच्छता आणि देखभाल उशिरा होते, परिणामी पुण्याहून सुटणाऱ्या गाड्यांनाही उशीर होतो.
- गाड्यांना उशीर झाल्यास प्रवाशांना घेण्यासाठी आलेले नातेवाईक, तसेच रिक्षा आणि कॅब चालक स्थानकाबाहेर थांबून राहतात. स्थानक परिसरात वाहतूक कोंडी होते.
पुण्यात दाखल होणाऱ्या रेल्वे गाड्यांना विविध सेक्शनमध्ये कामे सुरू असल्याने उशीर होत आहे. मात्र तरीसुद्धा पुण्याहून सुटणाऱ्या रेल्वे गाड्या आपल्या निर्धारित वेळेनुसार सोडण्यास आम्ही प्राधान्य देतो.
- हेमंत कुमार बेहरा, जनसंपर्क अधिकारी, रेल्वे विभाग, पुणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.