दहशतवादी हल्ल्यात
१५ सैनिक मृत्युमुखी
पाकिस्तानातील घटना; अनेक सैनिक जखमी
पेशावर, ता. १० (पीटीआय) : पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यामध्ये १५ सैनिकांचा मृत्यू झाला. या घटनेमध्ये अनेक सैनिक जखमीही झाले आहेत.
बन्नू जिल्ह्यामध्ये दहशतवादी स्फोटकांनी भरलेली गाडी पोलिसांच्या चौकीवर धडकवण्याच्या प्रयत्नात होते. एका सैनिकाने त्या गाडीवर गोळीबार केला असता, स्फोटकांचा स्फोट झाल्याचे एका पोलिसाने सांगितले. या स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती, की परिसरातील अनेक घरांची छते कोसळली. तसेच, पोलिस चौकीही पूर्ण उद्ध्वस्त झाली. त्यामध्ये अनेक पोलिस ढिगाऱ्याखाली आदळले. या स्फोटानंतर दहशतवाद्यांच्या मोठ्या गटाने हल्ला चढवला आणि चकमक उडाली. या घटनेत १५ सैनिकांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाल्याचे पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितले. या घटनेमध्ये अनेक दहशतवादी मृत्युमुखी पडले असण्याची शक्यता आहे.
खैबर पख्तुन्ख्वाचे मुख्यमंत्री महंमद सोहेल आफ्रिदी यांनी या हल्ल्याचा निषेध केला असून, या हल्ल्यातील मृतांविषयी शोक व्यक्त केला आहे. पोलिसांच्या चौकीवर झालेला हा अतिशय दुर्दैवी आणि नृशंस आहे. या हल्ल्यांमुळे पोलिस आणि जनतेचे मनोबल कमी होणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
गेल्या आठवड्यातही खैबर पख्तुन्ख्वामध्ये अशाच पद्धतीने हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. पोलिस चौकीच्या दिशेने येणाऱ्या दहशतवाद्यांच्या वाहनावर पोलिसांनी गोळीबार केला होता. त्यामुळे ते वाहन एका घराला धडकून स्फोट झाला होता. त्यात सात ते आठ जण जखमी झाले होते.