सासवड, ता. २७ : सासवड (ता. पुरंदर) येथील शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल सीबीएसई येथे गुरुवारी (ता. २५) खाद्यमहोत्सव २.० झाला. विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक दृष्टिकोन विकसित व्हावा आणि कमवा व शिका या उपक्रमाला चालना मिळावी, या उद्देशाने याचे आयोजन केले होते.
प्राचार्या रेणुकासिंग मर्चंट यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले. महोत्सवात विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले पाणीपुरी, भेळ, केक, ज्यूस, मिसळपाव अशा विविध स्वादिष्ट पदार्थांचे स्टॉल लावले होते. शाळेतील दोन विद्यार्थ्यांनी केवळ ५०० रुपयांची गुंतवणूक करून ४५०० रुपयांची विक्री केली. विद्यार्थ्यांची मांडणी आणि विक्री कौशल्य पाहून संस्थेच्या अध्यक्षा आनंदीकाकी जगताप, सचिव माजी आमदार संजय जगताप आणि सहसचिव एन. डी. गवळी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यावेळी सीबीएसईचे प्राचार्य अनिल पाटील, जनसंपर्क अधिकारी अमोल सावंत आदी उपस्थित होते.