महापालिकेत प्रवेश होऊन चार वर्षे उलटली. दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा कर जमा होत आहे. मात्र, त्याबदल्यात पालिकेकडून केवळ नावापुरती देखभाल केली जात आहे. पुरेसा पाणीपुरवठा, वाहतुकीयोग्य चांगले रस्ते, दिवाबत्ती, सांडपाणी, कचरा व्यवस्थापन, आरोग्य व शिक्षण सुविधा हे सर्व जणू रामभरोसे आहे. तक्रार केल्याशिवाय देखभाल-दुरूस्तीसाठी कोणीही येत नाही. त्या-त्या विभागासाठी नेमलेले अभियंते खुर्ची सोडत नाहीत. सगळा भोंगळ कारभार सध्या सुरू आहे.
- अमित तुपे, मांजरी बुद्रूक
आमचे गाव छोटे आहे. तरीही पालिकेकडून आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात कुचराई केली जात आहे. पाणीपुरवठ्यासह अनेक गोष्टी नागरिकांना स्वखर्चाने कराव्या लागतात. टॅंकरने मिळणारे पाणी अपुरे आहे. आजही ग्रामपंचायतीने पूर्वी दिलेल्या सुविधांवरच गरज भागविली जात आहे. शाळा इमारती, स्वच्छतागृहे, ओढे-नाले यांच्या स्वच्छतेकडेही दुर्लक्ष झालेले आहे. महामार्गासह अंतर्गत रस्तेही अतिक्रमणांनी वेढले आहेत. वस्त्यांकडे जाणाऱ्या रस्त्यावर दिव्यांची पुरेशी सोय झालेली नाही. परिसरातून जाणारे कालवे कचऱ्याने भरलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये आम्ही फक्त कर भरत राहायचा का?
- मोहन कामठे, शेवाळेवाडी