वडगाव मावळ, ता. २८ : आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या अनुषंगाने मावळ तालुक्यातील आठ रस्त्यांची आंतरराष्ट्रीय मापदंडानुसार सुधारणा व उच्च दर्जाचे डांबरीकरण झाले आहे. या ‘स्टार रोड’ने मावळ व मुळशीमधील पर्यटनस्थळे जोडली गेली आहेत. त्यामुळे आगामी काळात पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे.
स्पर्धेसाठी ‘पीएमआरडीए’च्या ठेव अंशदान योजनेतून सुमारे ४४ कोटी ४० लाख रुपये खर्चून मावळ तालुक्यातील सुमारे ३५ किलोमीटर व हवेली तालुक्यातील ९ किलोमीटर अंतरातील रस्त्यांची सुधारणा व चांगल्या पद्धतीने डांबरीकरण करण्यात आले आहे. सुमारे अडीच किलोमीटरचे रस्ते ३.७५ मीटर रुंदीचे होते. त्यांचे ५.५० मीटर रुंदीकरण करण्यात आले आहे. डोणे ते शिवणे, शिवणे ते कडधे तसेच काले ते जवन या रस्त्यांवर सध्या साइडपट्ट्या भरण्याचे काम सुरू आहे. काही नद्या व ओढ्यांवरील पुलांवर संरक्षक जाळ्या व कठडे लावण्याचे कामही करण्यात येत आहे. एक जानेवारीनंतर थर्मोप्लॅस्टिक पेंटने रस्त्यावर मार्किंग करण्याचे काम सुरू होईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम वडगाव विभागाचे उप अभियंता धनराज दराडे व सहाय्यक अभियंता पूनम जाधव यांनी दिली.
या मार्गावर होणार स्पर्धा
जवन-ब्राह्मणोली-पवनानगर, काले-कडधे, कडधे-शिवणे, शिवणे-डोणे, डोणे-आढले फाटा, आढले बुद्रुक फाटा ते बेबडओहोळ राइस मिल, बेबडओहोळ राइस मिल ते चांदखेड
वीस गावांना फायदा
पावसाळ्यात दुरवस्था झालेल्या रस्त्यांची सायकल स्पर्धेच्या निमित्ताने सुधारणा होत आहे. त्यामुळे मावळातील सुमारे वीस गावांना फायदा होणार आहे. कासारसाई, पवना धरण, तिकोना, हडशी ही मावळ व मुळशीतील पर्यटनस्थळे जोडली गेली आहेत.
सायकल स्पर्धेनिमित्त रस्त्यांचा कायापालट झाला आहे. प्रथमच एवढ्या चांगल्या पद्धतीने रस्त्यांची कामे झाली आहेत. अशा स्पर्धा वारंवार व्हाव्यात. यामुळे ग्रामीण रस्त्यांचे भाग्य उजळेल.
- रवींद्र घारे, ग्रामस्थ, बेबडओहळ
पावसामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली होती. सायकल स्पर्धमुळे रस्त्याची सुधारणा व डांबरीकरण झाले. शनिवार रविवारी या रस्त्यावरून पर्यटक जातात त्यांनाही उपयोग होईल.
- किशोर साळुंखे, ग्रामस्थ, आढले बुद्रुक
खड्डेमय रस्त्यांमुळे सर्वांचे हाल होत होते. पावसाळ्यानंतर तात्पुरती डागडुजी व्हायची. आता पहिल्यांदाच दूरपर्यंत चांगला रस्ता केला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधान आहे.
-बाळासाहेब वाळुंज, ग्रामस्थ, शिवणे
( टीप: छायाचित्रे दक्ष काटकर पाठवत आहे )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.