घारेवाडीत बलशाली युवा हृदय संमेलन
नऊ जानेवारीपासून प्रारंभ; युवक- युवतींचा वाढणार सहभाग
विंग/कोळे, ता. २७ ः घारेवाडी (ता. कऱ्हाड) येथे २५ व्या बलशाली युवा हृदय संमेलनास ९ जानेवारीपासून प्रारंभ होत आहे. युवकांत देशभक्ती, सकारात्मक ऊर्जा, सामाजिक जाणीव निर्माण व्हावी, हा संमेलनाचा उद्देश असून, स्वकर्तृत्वावर विविध क्षेत्रात यश मिळवून समाजात वेगळा ठसा उमटवणाऱ्या प्रेरणादायी व्यक्तीचे मार्गदर्शन संमेलनात लाभणार आहे. यात युवक-युवतींनी सहभागी होण्याचे आवाहन संयोजकानी केले आहे.
श्री स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधून शिवम प्रतिष्ठानतर्फे घारेवाडी (ता. कऱ्हाड) येथे प्रतिवर्षी बलशाली युवा हृदय संमेलन आयोजित केले जाते. युवा संमेलनात विविध वक्त्यांची व्याख्याने होतील. ९ जानेवारीला गुजरात येथील समाजसेविका मित्तल पटेल यांच्या समानता के राह पर विषयावर व्याख्यानाने संमेलनास प्रारंभ हाेईल. पुण्याच्या सायबर पत्रकार, लेखिका मुक्ता चैतन्य यांचे स्क्रीनटाइम-डिजिटल डिटॅाक्स या विषयावर, मुंबई येथील व्यवसायतज्ज्ञ ओंकार माळी हे स्टार्ट-अप-ते एक्स्पोर्टवर व्याख्यान, पर्यावरणतज्ज्ञ सतीश खाडे यांचे तळाच्या पायाच्या भेगा भरशील का रे मेघा या विषयावर व्याख्यान होईल. दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात डॉ. उज्ज्वलकुमार चव्हाण यांचे अभ्यासासाठी विपश्यनेची उपयुक्तता या विषयावर व्याख्यान होईल. यावेळी युवराज पाटील हे नांदेड येथील कादंबरीकार मनोज बोरगावकर यांची प्रकट मुलाखत घेतील. दुपारच्या सत्रात पुण्याचे उद्याेजक गावरान कुक्कुटपालन सौरभ तापकीर यांची विपुल धनगर हे मुलाखत घेतील. म्हैसूरच्या समाजसेविका फतिमा शबाना यांची रेणुका कल्पना मुलाखत घेतील. सायंकाळच्या सत्रात शौर्य पुरस्कारप्राप्त मधुसूदन सुर्वे यांच्या धैर्य आणि समर्पणाची शौर्यगाथा या विषयावर व्याख्यान हाेईल. तिसऱ्या दिवशी ऋचिका खोत व स्वामीराज भिसे यांचे कीर्तावनी वारी आडवाटांच्या विठोबाची संकीर्तनाने कार्यक्रम होईल. युवा समाजसेवक सिद्धेश लोकरे यांच्या मिशन ३०३०३ जेन - झेड सफर सपनों का या विषयावर व्याख्यान हाेईल. त्यानंतर संस्थापक इंद्रजित देशमुख यांच्या व्याख्यानाने संमेलनाची सांगता हाेईल. ऑनलाइन नावनोंदणीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल पाटील व संयोजकानी केले आहे.
-------------------