मार्केट यार्ड, ता. ८ : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत तब्बल २०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. ठेकेदार, पार्किंग, सुरक्षा रक्षक, रोजंदारी कर्मचारी कायम करणे, गाळ्यांचे वाटप, परवाना गैरव्यवहार तसेच जी-५६ या खुल्या जागांमध्ये अनियमितता करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे त्यांनी सांगितले. या सर्व गैरव्यवहारात पालकमंत्री अजित पवार यांच्या नावाचा वापर केला गेला असल्याचाही आरोप पवार यांनी केला.
पवार म्हणाले, ‘‘बाजार समितीत हजारो बोगस परवाने देऊन शेतकऱ्यांना लुटले जात आहे. प्रत्यक्ष परवानाधारक ९०० ते १००० असताना तब्बल ४००० बोगस परवाने देण्यात आले. त्याचबरोबर जी-५६ मधील ५६ जागा काही संचालकांनी अनधिकृतरीत्या ताब्यात घेऊन भाड्याने देत महिन्याला ७० ते ८० लाख रुपयांचा अपहार सुरू आहे. फूलबाजारातील गाळ्यांचे वाटपही अपारदर्शक असून अनेक गाळे मंडळातील संचालकांनी आपल्या नातेवाइकांना बेकायदेशीर पद्धतीने दिले आहेत. याशिवाय, ‘रोजंदारी कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांच्या एजन्सीच्या नावावर बोगस बिलं उचलली जात आहे. प्रत्यक्ष अस्तित्वात नसलेल्या कर्मचाऱ्यांच्या पगाराचा पैसा संचालक मंडळातील काहीजणांच्या खिशात जात आहे. पार्किंगच्या नावाखाली शेतकरी व वाहतूकदारांची लूट होत आहे. अधिकृत पावती फक्त दहा रुपयांची दिली जाते. मात्र प्रत्यक्षात २०० ते ३०० रुपयांपर्यंत रक्कम वसूल केली जाते. या सर्व प्रकारामुळे शेतकरी, वाहतूकदार आणि कामगार वर्ग प्रचंड अडचणीत सापडला आहे.” बाजार समितीत शेतकऱ्यांची होणारी लूट थांबली पाहिजे. यावर काही कार्यवाही न झाल्यास पंधरा दिवसांत शेतकऱ्यांचे आंदोलन केले जाईल, असा इशाराही पवार यांनी दिला.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश जगताप म्हणाले, ‘‘समितीचे वार्षिक उत्पन्न १०६ कोटी रुपये आहे. त्यातील ६० कोटी रुपये कर्मचाऱ्यांचे पगार द्यायलाच जातात. इतर खर्च वजा करता ३० ते ३५ कोटी रुपयेच शिल्लक राहतात. असे असताना २०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार कसा झाला. हवेली तालुक्यातील राजकीय द्वेषापोटी पवार यांना कोणीतरी चुकीची माहिती देत आहे. भविष्यात निवडणुका आहेत. त्यामुळे आरोप होत आहेत.’’
---------
अजित पवार यांनी स्पष्ट करावे
अजित पवार चुकीच्या कामांना पाठीशी घालणार नाहीत, अशी आमची भावना आहे. मात्र, बाजार समितीचे सर्व संचालक अजित पवार यांनी सांगितले आहे, असे सांगत त्यांच्या नावावर गैरव्यवहार करत आहेत. त्यामुळे संचालक मंडळाची पाठराखण करत आहोत का हे पालकमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले पाहिजे, असे रोहित पवार यांनी नमूद केले.
-------------
चौकट
संचालकाला अवैध भाडे
संचालक गणेश घुले यांनी बाजार समितीच्या ५६ जागा चुकीच्या पद्धतीने काही लोकांना दिल्या आहेत. यापोटी महिन्याला ७० ते ८० लाख रुपये भाडे अवैध पद्धतीने घुले यांना दिले जाते. याला ‘जी ५६’ म्हटले जाते, असा आरोप पवार यांनी केला. यावर संचालक घुले म्हणाले, ‘‘मे २०२४ पासून मासिक भाडे तत्वावर जागा घेतल्या आहेत. बाजार समितीने ठरवून दिल्याप्रमाणे दरवर्षी दहा टक्के वाढ याप्रमाणे पैसे भरत आहोत. माझ्या मुलाचा या जागांशी कोणताही संबंध नाही.’’
--------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.