मार्केट यार्ड, ता. १ : कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यातील प्रस्तावित बदलांबाबत ग्राहकांच्या बाजूनेही गांभीर्याने विचार करावा, कायद्यातील बदलांपूर्वी ग्राहकांचे म्हणणे ऐकावे. या संदर्भात अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे उपाध्यक्ष सूर्यकांत पाठक यांनी पणनमंत्री जयकुमार रावल यांना निवेदन पाठवून लक्ष वेधले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, ग्राहकांकडून आधीच सर्व कृषी उत्पन्न वस्तूंवर ५ ते १८ टक्के जीएसटी आकारला जातो. त्यावर पुन्हा बाजार समित्यांकडून आकारली जाणारी बाजार फी ही दुहेरी कर आकारणी ठरत असून, ती तत्काळ रद्द करावी. बाजार समित्यांचा उद्देश मूलतः शेतकरी, व्यापारी आणि ग्राहक या तिन्ही घटकांच्या हितसंरक्षणासाठी होता; मात्र सध्या सेस वसुलीचे प्रमुख साधन म्हणूनच हा कायदा वापरला जात आहे.
कृषी बाजार कायद्यातील सुधारणा करताना तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे हा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे. दररोजचे दर, मागणी–पुरवठा स्थिती, हवामानातील बदल आणि बाजारातील घडामोडी यांची अचूक डिजिटल माहिती शेतकऱ्यांना मिळणे गरजेचे आहे. तसेच बाजार समित्यांमधील शुल्क आकारणी पारदर्शक करण्यासाठी ई-रिसिट, ऑनलाइन व्यवहार व ऑडिट यंत्रणा बळकट करणे अत्यावश्यक आहे. अनावश्यक आकारणी रोखण्यासाठी स्पष्ट धोरण ठरवून त्याची कडक अंमलबजावणी करणेही महत्त्वाचे ठरेल. सुधारणा प्रक्रियेत ग्राहक, शेतकरी आणि व्यापारी या तिन्ही घटकांचा सहभाग निश्चित केल्यास कायदा अधिक न्याय्य आणि प्रभावी ठरणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
--------------
शेतकऱ्यांना सुविधा पुरवा
बाजार समित्यांनी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ देण्यासाठी मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. साठवणूक गोदामे, गोडाऊनमधील तापमान नियंत्रित व्यवस्था, स्वच्छता व पॅकिंग युनिट्स, अन्न तपासणी प्रयोगशाळा, हवामानविषयक सततचे मार्गदर्शन, वित्तसाहाय्य आणि निर्यातक्षम मालासाठी आवश्यक प्रमाणपत्रे अशा सुविधा उपलब्ध झाल्यास शेतमालाचे मूल्य वाढेल. बाजारपेठेत थेट खरेदीदार वाढून शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य व न्याय्य दर मिळू शकतील. त्यासाठी बाजार समित्यांनी सक्षम पायाभूत सुविधा उभारणे अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
---------
फक्त हमीभाव जाहीर करून उत्पादन वाढणार नाही; तर बाजार समित्यांत अधिक खरेदीदार आकर्षित करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्या. या कायद्याची अंमलबजावणी करण्यापूर्वी ग्राहक प्रतिनिधींचे म्हणणे प्रत्यक्ष ऐकून घ्यावे.
- सूर्यकांत पाठक, उपाध्यक्ष, अखिल भारतीय ग्राहक पंचायत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.