‘‘कामगारांच्या प्रश्नावर तत्त्वांनी चालणारे व्यक्ती म्हणजे बाबा आढाव. आपल्या घटकांना न्याय मिळावा, यासाठी कायम प्रामाणिकपणे काम करणारे बाबा होते. मार्केट यार्ड येथील कामगार, कष्टकरी वर्ग, रिक्षा चालक, कागद, काच, पत्रा वेचक यांच्यासह गोर गरिबांच्या न्यायासाठी लढणारा कामगार नेता म्हणून त्यांची ख्याती होती. मार्केट वर्गातील सर्व व्यापारी संघटनांना बाबांविषयी मोठा आदर होता. त्यांनी व्यापाऱ्यांच्या न्यायासाठीदेखील आंदोलन केले आहे.
- विलास भुजबळ, माजी अध्यक्ष, अडते असोसिएशन
- -----
‘‘कामगार नेते बाबा आढाव हे कष्टकरी वर्गाचे खरे कैवारी होते. आयुष्यभर त्यांनी श्रमिकांच्या हक्कांसाठी संघर्ष केला, न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरायला कधीही मागेपुढे पाहिले नाही. त्यांचे कार्य एवढे खोलवर रुजले होते, की त्यांनी संपूर्ण जीवनच कष्टकरी कामगारांच्या प्रगतीसाठी वाहून घेतले होते. अनेक आंदोलनांतून, कायद्यांवर ठोस भूमिका घेऊन, संघटनांना बळकटी देऊन, त्यांनी कामगारांना सन्मान, सुरक्षितता आणि अधिकार मिळवून देण्याचा अथक प्रयत्न केला. बाबांच्या जाण्याने कामगार चळवळीसमोर एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
- पोपटलाल ओस्तवाल, माजी अध्यक्ष, दि पूना मर्चंट्स चेंबर
‘‘छत्रपती शिवाजी महाराज कामगार युनियनची जबाबदारी २००६ मध्ये माझ्यावर सोपवली गेली. तेव्हापासून डॉ. बाबा आढाव यांचे मार्गदर्शन हेच माझे बळ ठरले. दुर्बल घटकांना न्याय आणि शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव ही त्यांची भूमिका होती. त्यांच्या प्रेरणेने आम्ही कांदा, टोमॅटो, कोथिंबीर यांना उत्पादन खर्चावर आधारित हमीभावाचा आराखडा तयार करून राज्य व केंद्र सरकारला दिला. प्रतिसाद न मिळाल्याने २ ऑक्टोबर २०१४ रोजी बाबांच्या नेतृत्वाखाली सात दिवसांचे उपोषण केले. बाबांमुळे रखडलेली घरकुल योजना २०१२ मध्ये पूर्ण झाली आणि कष्टकऱ्यांना सावकारीतून मुक्त करण्यासाठी पतसंस्थेची स्थापना झाली.
- संतोष नांगरे, अध्यक्ष, कामगार युनियन
- -------
‘‘डॉ. बाबा आढाव हे केवळ कामगारांचे नेते नव्हते तर समाजातील सर्वात दुर्बल माणसाच्या हक्कासाठी आयुष्यभर झटणारे नेते होते. विचारांवर ठाम, कृतीत पारदर्शी आणि संघर्षात निर्धार असे त्यांचे प्रत्येक पाऊल समाजाला नव्या दिशेने नेणारे होते. माथाडी कायद्यापासून देवदासी, कचरा कामगार, विस्थापित, शेतकरी अशा प्रत्येक वंचित घटकासाठी ते निर्भीडपणे उभे राहिले.
- दिलीप काळभोर, माजी सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे
- --------
‘‘बाबा आढाव हे केवळ कामगार आणि कष्टकरी वर्गाचे नेते नव्हते, तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरही त्यांनी तितक्याच ताकदीने आवाज उठवला. शेतकऱ्यांच्या अडचणी, उत्पादनखर्च, बाजारातील अस्थिरता आणि हमीभावाची गरज यांची त्यांना जाणीव होती. त्यामुळेच शेतमालाला योग्य हमीभाव मिळावा, शेतकऱ्यांचे आयुष्य सुरक्षित व्हावे, यासाठी त्यांनी अनेक आंदोलनांचे नेतृत्व केले आणि शासनाचे लक्ष वेधून घेतले.
- प्रकाश जगताप, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे
-------
‘‘समाजातील गोरगरीब, वंचित, असंघटित अशा प्रत्येक घटकासाठी बाबा आयुष्यभर झटले. त्यांच्या कामात संवेदनशीलता आणि निःस्वार्थपणा होता. समता, मानवी हक्क आणि सामाजिक न्यायासाठी अखंड लढण्याची प्रेरणा म्हणजे बाबा आढाव.
- गोरख मेंगडे, सचिव, पुणे हमाल पंचायत
-------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.