मार्केट यार्ड, ता. २८ : सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या डाळिंबाला रविवारी (ता. २८) गुलटेकडी मार्केट यार्डातील फळ बाजारात विक्रमी भाव मिळाला. साताऱ्यातून आलेल्या ३६ किलो डाळिंबाला प्रतिकिलोस ६०० रुपये, तर ७८ किलो डाळिंबाला प्रतिकिलोस ४०० रुपये असा भाव मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
डाळिंबाची ही आवक मार्केट यार्डातील फळ बाजारातील गाळा क्रमांक ६९८ येथील व्यापारी रावसाहेब कुंजीर यांच्या गाळ्यावर झाली. डाळिंबाची खरेदी व्यापारी धनराज मोटे यांनी केली. बाजारात दोन महिन्यांपूर्वी दररोज ५० ते ६० टन डाळिंबाची आवक होत होती, मात्र सध्या ही आवक घटून २५ ते ३० टनांपर्यंत आली आहे. आवक जास्त असताना डाळिंबाला प्रतिकिलोस १०० ते २५० रुपये भाव मिळत होता, मात्र आवक घटल्याने हा दर १८० ते थेट ६०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
यंदा पावसाला लवकर सुरुवात झाल्याचा परिणाम डाळिंबाच्या फुलांवर झाला. फुलांचे प्रमाण कमी राहिल्याने फळधारणाही घटली. परिणामी बाजारात डाळिंबाची आवक दिवसेंदिवस कमी होत आहे. मे-जूनपर्यंत तुरळक आवक राहणार असून, त्यानंतर नव्या हंगामातच आवक वाढण्याची शक्यता असल्याची माहिती व्यापारी प्रकाश बडदे यांनी दिली.
गेल्या वर्षी डाळिंबाला सरासरी ३०० रुपयांपर्यंत भाव मिळत होता. यंदा मात्र तो थेट ६०० रुपयांपर्यंत गेल्याने समाधान आहे. अडीच ते तीन एकर क्षेत्रात डाळिंबाची सुमारे एक हजार झाडे आहेत. गेल्या वर्षी सुमारे ३० टन उत्पादन मिळाले होते, मात्र यंदा केवळ १० टन उत्पादन हाती आले.
- सचिन देवकर, शेतकरी (ता. माण, जि. सातारा)