राहू, ता. १० : दिवसभर कडाक्याचे ऊन आणि वाढलेल्या उकाड्यानंतर सायंकाळी मिळालेल्या गारव्यात दौंड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात भाद्रपदी बैलपोळा पारंपरिक पद्धतीने साजरा झाला. यांत्रिकीकरणामुळे बैलांची संख्या कमी झाली असली, तरी शेतकऱ्यांनी उत्साहात मिरवणुका काढत ग्रामदैवतांचे दर्शन घेतले.
राहू बेट परिसरातील पिलाणवाडी, डुबेवाडी, टेळेवाडी, दहिटणे, मिरवडी, मेमाणवाडी, सांगवी सांडस, पाटेठाण, टाकळी भीमा, वडगाव बांडे, पानवली, कोरेगाव भिवर, वाळकी, पिंपळगाव, खामगाव, नांदूर, सहजपूर, बोरीभडक, बोरीऐंदी, देलवडी, लडकतवाडी, उंडवडी, तांबेवाडी आणि खुटबाव आदी गावांमध्ये सायंकाळी साडेपाच ते रात्री आठ वाजेपर्यंत सणाचा उत्साह दिसून आला. पारंपरिक वाद्यांचा गजर, भक्तीमय संगीत आणि गुलाल-भंडाऱ्याच्या उधळणीत बैलांची मिरवणूक काढण्यात आली.
शेतीकामात आधुनिक यंत्रांचा वापर वाढल्याने परिसरात बोटावर मोजण्याइतक्याच बैलजोड्या शिल्लक राहिल्या आहेत. काही शेतकरी केवळ घराण्याची परंपरा आणि हौस म्हणून बैलजोडी पाळत आहेत. दरम्यान, यांत्रिकीकरणामुळे जिवंत बैलांची संख्या घटल्याने मातीच्या बैलजोड्यांच्या मागणीत वाढ झाली आहे. बापू कुंभार, गणेश कुंभार, स्वप्निल कुंभार, माणिक कुंभार, सचिन कुंभार आणि नितीन कुंभार या मूर्तिकारांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा पाच हजारांहून अधिक शाडूच्या बैलजोड्यांची विक्री झाली आहे.
‘‘आमच्या घरी पिढीजात बैलजोडी आहे. बळिराजाचा सन्मान म्हणून आम्ही दरवर्षी कुटुंबीयांसमवेत हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतो,’’ अशी प्रतिक्रिया बैलजोडी मालक लक्ष्मण डुबे आणि शिवाजी डुबे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.