लोणी काळभोर, ता. २४ : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर खरेदी, चहापान आणि अन्य कामांसाठी वाहने थेट रस्त्यावर उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांविरोधात लोणी काळभोर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. लोणी स्टेशन चौकातील व्यावसायिक आस्थापनांसमोर तसेच थेऊर-कोलवडी रस्त्यावर धोकादायक पद्धतीने वाहने उभी करणाऱ्या चार वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
अभिजित विठ्ठल शितोळे (वय २३, रा. कोरेगाव मूळ), अविनाश काळुराम मोडक (वय ३१, रा. फुरसुंगी), सचिन बालाजी जाधव (वय ३६, रा. सोरतापवाडी) आणि उमाशंकर सोमनाथ शिवांगे (वय ६०, रा. सद्गुरुनगर, भोसरी) अशी कारवाई करण्यात आलेल्या वाहनचालकांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार लोणी काळभोर पोलिसांच्या पथकाने लोणी स्टेशन चौक, लोणी टाऊन आणि थेऊर परिसरात गस्त घातली. त्यावेळी महामार्गावर चारचाकी वाहने बेशिस्तपणे उभी केल्याने अन्य वाहनांच्या वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याचे आढळले.
लोणी स्टेशन चौकातील कदमवाकवस्ती परिसरात दूर्वांकुर मोबाईल शॉपीसमोर अभिजित शितोळे याने चारचाकी उभी केली होती. त्याच्या वाहनामुळे सोलापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. तसेच अविनाश मोडक याच्यावरही कारवाई करण्यात आली. तसेच आशिष एंटरप्रायझेस या स्टेशनरी दुकानासमोर वाहन उभे करून कुरिअर आणण्यासाठी गेलेल्या सचिन जाधव याच्याविरुद्धही पोलिसांनी कारवाई केली.
थेऊर गाव ते कोलवडी रस्त्यावर ट्रक धोकादायक स्थितीत उभा असल्याचे आढळले. ट्रकचालक उमाशंकर शिवांगे याने रस्त्यावरच वाहन उभे केल्याने मागील बाजूस वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या प्रकरणी पोलिस हवालदार संतोष बारगजे यांनी फिर्याद दिली.
कारवाईदरम्यान पोलिसांनी पंचांच्या उपस्थितीत ई-साक्ष अॅपद्वारे घटनास्थळाची नोंद केली आणि संबंधित वाहनचालकांना वाहने हटविण्यास सांगितले. महामार्गावर किंवा वर्दळीच्या भागात वाहन उभे करताना वाहतुकीला अडथळा होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.