वॉशिंग्टन, ता. १८ (पीटीआय) : अमेरिकेमध्ये निवडणूक कायदे अधिक कडक असणे आवश्यक असल्याची भूमिका मांडताना अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज भारतातील निवडणूक प्रक्रियेचे कौतुक केले. तसेच, अमेरिकेमधील निवडणुकीत मतदारांना वैध मतदार ओळखपत्राशिवाय मतदान करू दिले जात असल्याबद्दल भारताचे निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आश्चर्य व्यक्त केले होते, ती आठवणही त्यांनी सांगितली.
ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’ या स्वत:च्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ‘सेव्ह अमेरिका’ कायद्याला पाठिंबा देण्याचे आवाहन जनतेला केले. ‘‘भारतात नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ६४ कोटी ६० लाख लोकांनी मतदान केले. ही संख्या प्रचंड असूनही टपालाद्वारे मतदान करणाऱ्यांचे प्रमाण एक टक्क्यापेक्षा कमी होते. मतदान केलेल्या प्रत्येकाकडे मतदार ओळखपत्र होते. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्तांची मागील महिन्यात अमेरिकेतील अधिकाऱ्यांबरोबर चर्चा झाली. त्यावेळी त्यांनी, छायाचित्रासह असलेल्या वैध ओळखपत्राशिवाय अमेरिकेत मतदान कसे होऊ दिले जाते, अशी शंका उपस्थित केली होती. आपल्यालाही ‘सेव्ह अमेरिका ॲक्ट’ तातडीने मंजूर करण्याची गरज आहे,’’ असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
डोनाल्ड ट्रम्प हे ‘सेफगार्ड अमेरिकन व्होटर एलिजिबिलिटी (सेव्ह) अमेरिका’ या कायद्यासाठी आग्रही आहेत. या प्रस्तावित कायद्यातील तरतुदीनुसार, मतदान करण्याआधी अमेरिकी नागरिकांना त्यांच्या नागरिकत्वाचा पुरावा दाखविणे आवश्यक ठरणार आहे. तसेच, मतदार ओळखपत्र तयार करण्याची आणि टपालाद्वारे मतदानावर मोठ्या प्रमाणावर मर्यादा आणण्याचीही तरतूद आहे. या तरतुदींमुळे निवडणुकीत होणारे गैरप्रकार टाळले जातील, असा ट्रम्प यांचा दावा आहे.
खासदारांमध्ये मतभेद
अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘सेव्ह अमेरिका’ कायद्यावरून डेमोक्रॅटिक पक्ष आणि सत्ताधारी रिपब्लिकन पक्षातील खासदारांमध्येही मतभेद आहेत. या प्रस्तावित कायद्यावर सिनेटमध्ये पाच आठवडे चर्चा होऊनही कोणताही निष्कर्ष निघाला नव्हता. ट्रम्प मात्र वारंवार या कायद्यासाठी आग्रह करत आहेत. भारत आणि ब्राझील या देशांनी मतदार ओळखपत्र जैविक ओळखीला (बायोमेट्रिक) जोडले आहेत. अमेरिकेत मात्र अद्यापही मतदारांच्या स्वयंघोषणा पत्रावर अवलंबून राहण्याची पद्धत आहे, असे ‘व्हाइट हाउस’च्या संकेतस्थळावर म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.