लष्करी वृत्तपत्राच्या
संपादकांची हकालपट्टी
अमेरिकेतील वृत्तपत्रावर ट्रम्प यांची कारवाई
वॉशिंग्टन, ता. २२ (वृत्तसंस्था) : अमेरिकेतील प्रतिष्ठित लष्करी वृत्तपत्र ‘स्टार्स अँड स्ट्रिप्स’मधील मुख्य संपादकासह वरिष्ठ पत्रकारांची हकालपट्टी करण्यात आल्याने अमेरिकचा संरक्षण विभाग आणि ट्रम्प प्रशासन पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. संपादकीय स्वातंत्र्यासाठी ठाम भूमिका घेतल्याची शिक्षा म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप संबंधित पत्रकारांनी केला आहे. या घटनेमुळे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात वाढत्या सेन्सॉरशिपच्या धोक्यांबाबत आंतरराष्ट्रीय वर्तुळात तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे.
संपादकीय स्वातंत्र्याचा बळी?
‘स्टार्स अँड स्ट्राइप्स’चे मुख्य संपादक एरिक स्लाविन आणि पश्चिम आशियातील प्रतिनिधी लारा कोर्टे यांना पेंटागॉनकडून सेवासमाप्तीची नोटीस बजावण्यात आली आहे. याशिवाय, वृत्तपत्राचे प्रकाशक मॅक्स लेडरर यांनाही प्रशासनाने बाहेरचा रस्ता दाखवला आहे. स्लाविन यांच्या मते, कायदा आणि संरक्षण विभागाची धोरणे लष्करी पत्रकारांना संपादकीय स्वातंत्र्य देतात. मात्र, सैनिकांसाठीच्या वृत्तांकनावर सेन्सॉरशिप लादली गेल्यास ती आपल्यासाठी मर्यादा ठरेल, असे मत एका मुलाखतीत मांडल्यानेच ही कारवाई झाली आहे.
ट्रम्प प्रशासनाचा आक्षेप
वृत्तपत्रावरील कारवाई केवळ धोरणात्मक मतभेदांपुरती मर्यादित नसून, सैनिकांच्या वास्तविक परिस्थितीवरील वृत्तांकनाशी जोडली गेली आहे. ‘यूएसएस अब्राहम लिंकन’ या युद्धनौकेवर प्रदीर्घ काळ कार्यरत असलेल्या काही अमेरिकी नौसैनिकांमध्ये नैराश्य आणि आत्महत्येचे विचार बळावल्याचे वृत्त ‘स्टार्स अँड स्ट्राइप्स’ने प्रसिद्ध केले होते. ट्रम्प प्रशासनाने या बातम्यांवर तीव्र आक्षेप घेऊन त्या अतिरंजित आणि अप्रामाणिक असल्याचा दावा करण्यात आला होता.
प्रदीर्घ इतिहास
१९व्या शतकापासून आणि विशेषतः दुसऱ्या महायुद्धापासून परदेशात तैनात अमेरिकन सैनिकांचा विश्वासार्ह आवाज म्हणून ‘स्टार्स अँड स्ट्रिप्स’ या वृत्तपत्राचा इतिहास आहे. मात्र, या कारवाईमुळे लष्करांतर्गत होणाऱ्या पारदर्शक वृत्तांकनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याची भावना अमेरिकेतील माध्यम वर्तुळात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.