पुणे

Pune Rains : अस्मानी थैमानाचे २० बळी

सकाळ वृत्तसेवा

नऊ जण बेपत्ता, शोधकार्य सुरू; ८३२ जनावरे गेली वाहून
पुणे-  अवघ्या तीन तासांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पुण्यात बुधवारी (ता. २५) रात्री बारा जणांचा बळी गेला. याशिवाय, पावसाने हवेली तालुक्‍यात सहा आणि पुरंदर तालुक्‍यात दोन अशा एकूण २० जणांचा जिल्ह्यात मृत्यू झाला. याशिवाय, नऊ जण बेपत्ता असून अग्निशमन दल, ‘एनडीआरएफ’चे जवान त्यांचा शोध घेत आहेत. पावसात शहरातील शेकडो वाहने आणि शहर-जिल्ह्यात मिळून गायी, म्हशींसह ८३२ जनावरे वाहून गेली.

पावसाने रस्त्यांवर गाळ, राडारोडा येऊन गुरुवारी वाहतूक मंदावली होती. अनेक सोसायट्यांच्या बेसमेंटमध्ये साचलेल्या पाण्यात हजारो वाहने अडकली, आपत्तीग्रस्त भागात दिवसभर वीजपुरवठा खंडित राहिला. प्रामुख्याने दक्षिण पुण्यात अतिवृष्टी झाल्याचा फटका महापालिका आणि लगतच्या गावांमधील सुमारे पाच लाखांवर नागरिकांना बसला. पुण्याच्या दक्षिणेकडील कात्रज घाटात उगम पावून मध्य पुण्यापर्यंत वाहणाऱ्या आंबिल ओढ्याने विक्राळ रूप धारण केले. ओढ्याच्या दुतर्फा असलेल्या हजारो घरांत पाणी शिरले. याच भागात जीवितहानीही झाली. महापालिका प्रशासनाने मदतकार्य सुरू केले, तरी हानीच्या तुलनेत ते अपुरे ठरले.

आंबिल ओढ्याच्या पुरामुळे सर्वाधिक नुकसान अरण्येश्वर परिसरातील टांगेवाला कॉलनीत झाले. पुराच्या तडाख्याने सोसायट्यांच्या सीमाभिंती कोसळल्या. बुधवारी रात्री साडेअकराला टांगेवाला कॉलनी व गंगातीर्थ सोसायटीची सीमाभिंत कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला. 

सिंहगड रस्त्यावर मानाजीनगरजवळ, रायकर मळ्याजवळील ओढ्यात, सनसिटीजवळ तसेच कात्रज-कोंढवा रस्त्यावरील उड्डाण पुलाजवळ, कोंढवा खुर्द येथे स्वतंत्र घटनांत सात जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, पाण्यात वाहून गेलेल्या मुकेश गाडीलोहार (वय २८, रा. मानाजीनगर, नऱ्हे), निखिल दिनेश चव्हाण (वय २१, रा. संतोषनगर, कात्रज), साईनाथ ऊर्फ गणेश तुकाराम शिंदे (वय २२, रा. संतोषनगर, कात्रज), सूरज ऊर्फ बाबू संदीप वाडकर (वय २०, रा. संतोषनगर, कात्रज) या नागरिकांचा अग्निशमन दल व एनडीआरएफचे जवान शोध घेत आहेत.

पावसाच्या दुर्घटनेतील मृतांची नावे 
अरण्येश्‍वर येथे भिंत कोसळून मृत्यू
रोहित भारत आमले (वय १४ ) 
जान्हवी जगन्नाथ सदावरे (वय ३०)
श्रीतेज जगन्नाथ सदावरे (वय ८)
संतोष सहदेव कदम (वय ५५)
लक्ष्मी पवार (वय ६६, सर्व रा. टांगेवाला कॉलनी)

पाण्यात वाहून गेल्यामुळे
मच्छिंद्र पांडुरंग वाबळे (वय ४२, रा. टांगेवाला कॉलनी, अरण्येश्‍वर)
ज्योत्स्ना संजय राणे (वय ३०, टांगेवाला कॉलनी, अरण्येश्‍वर)
मच्छिंद्र बहुले (वय ३८, रा. नऱ्हे)
किशोर दत्तात्रय गिरमे (वय ५५, रा. नांदेड सिटी)
अमृता सुदामे (वय ३७, रा. नांदेड सिटी)
धर्मनाथ कुमार (वय ३०, रा. आंबेडकरनगर, कोंढवा खुर्द)
नागराज बाळकृष्ण भिल (वय २२, रा. कात्रज)

पुरंदर तालुका
गजराबाई सुदाम खोमणे (वय ७०)
छकुली अनंता खोमणे (वय २२)

हवेली तालुका 
गौरी श्‍याम सूर्यवंशी 
आरती श्‍याम सूर्यवंशी 
श्‍याम रामलाल सूर्यवंशी
राजू फकीर 
साईनाथ सोपान भालेराव
सुमन अजिनाथ शिंदे 


जिल्ह्यात एकूण ८३२ गायी, म्हशी, शेळी यांसारखी जनावरे पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्याने मृत्युमुखी पडली आहेत. त्यामध्ये ७८८ लहान जनावरे, तर ४४ मोठ्या जनावरांचा समावेश आहे. त्यामध्ये हवेली तालुक्‍यात ३५४, पुणे शहरात ३०, पुरंदर तालुक्‍यात ४४८ जनावरांचा समावेश आहे.

आजींना वाचविले; पण काळाने घेरले
रोहित आमले (वय १४) या मुलाच्या घरात पाणी शिरले. प्रसंगावधान राखत त्याने त्याच्या घरातील दोन आजींना सुरक्षित स्थळी हलविले. तोही तेथून बाहेर पडला. तेवढ्यात आपला लाडका श्‍वान घरातच राहिल्याचे त्याच्या लक्षात आले. कसाबसा तो घरात पोचला. श्‍वानाला घेऊन पाणी कापत तो माघारी परतला. त्यानंतर एका भिंतीच्या कडेला थांबलेल्या रोहितवर भिंत कोसळून काळाने घाला घातला. परंतु, त्याचा श्‍वान मात्र वाचला. अरणेश्वर कॉलनीत ही घटना घडली. रोहित हा विद्याविकास मंदिर प्रशालेमध्ये दहावीला शिकत होता. सोबतच आजीच्या छोट्या किराणा दुकानात तो हातभार लावत असे. या घटनेमुळे त्याच्या आजीने हंबरडा फोडला.

पुणे आणि बारामतीचे जनजीवन विस्कळित करणाऱ्या व अनेक बळी घेणाऱ्या महावृष्टीतील पीडितांना मदतीबाबत आपण संवेदनशीलतेने पाहत असून, पुणेकरांना यातून सावरण्यासाठी तत्काळ मदत पाठविण्यात आली आहे.
-देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री


पुढील ४८ तास गडगडाटी पावसाचे
पुढील दोन दिवस ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल, अशी ५१ ते ७५ टक्के शक्‍यता आहे. दोन दिवसांनंतर पावसाचा जोर कमी होईल. ऑक्‍टोबर महिन्याच्या सुरवातीला मॉन्सून परतीचा प्रवास सुरू करेल, असे हवामान खात्याचे शास्त्रज्ञ डॉ. अनुपम काश्‍यपी यांनी सांगितले. पुण्यात बुधवारी झालेला धुवाधार पाऊस म्हणजे ढगफुटी होती, अशी जोरदार चर्चा शहरात सुरू होती. मात्र, ‘‘शहरातील हा पाऊस म्हणजे ढगफुटीचा प्रकार नव्हता. शहरात फार तर एका तासात एक सेंटीमीटर पाऊस झाला असेल. ढगफुटीमध्ये याच्या दहापट पाऊस पडतो. काही तासांत झालेला तीव्र स्वरूपाचा पाऊस आणि उथळ झालेल्या ओढ्यांचे पात्र, यामुळे हा पाऊस भयानक ठरला,’’ असे त्यांनी स्पष्ट केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

MI vs KKR Live IPL 2024 : व्यंकटेश अय्यर - मनिष पांडेने केकेआरचा डाव सावरला; 15 षटकात मारून दिली चांगली मजल

SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

West Indies T20 WC 24 Squad : विंडीजच्या संघात सगळे स्टार मात्र इन फॉर्म जादूगारच मिसिंग

Latest Marathi News Live Update : जीएसटी फक्त अदानींच्या फायद्याचा- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT